दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
पावसाने ओढ दिल्याने विशेषतः फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्या वीर, भाटघर, नीरा – देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पुरेसा पाऊस नसल्याने फलटण तालुक्यात टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टंचाई आढावा घेण्यात आला. यावेळी आ. दिपक चव्हाण यांनी संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. फलटण तालुक्यात पहिल्या टप्प्यात ४७ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून ही संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
या आढावा बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सौ. डी. एस. बोबडे – सावंत, संजय गांधी योजना नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरवदे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होत्या.
प्रशासनाने तालुक्यातील ११० गावांपैकी पहिल्या टप्प्यात ४७ गावात टंचाई घोषीत केली आहे, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असताना ४७ पैकी ८ गावांत ११ टँकरने २४ खेपांद्वारे १८ हजार ४१२ लोकसंख्या आणि १६ हजार ९६३ जनावरांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याशिवाय ८ गावात खाजगी बोअर (विंधन विहीर) आणि विहीर अधिग्रहण करून त्यांचे पाणी त्या भागातील लोकवस्ती व जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
लोकवस्ती व जनावरांसाठी पिण्याचे पाण्यासाठी नीरा उजवा कालवा हाच आधार
तालुक्यात फलटण शहरासह बहुसंख्य गावात पिण्याच्या पाणी योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असल्याने धरणातील पाणीसाठे आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्यानंतर शहरासह तालुक्यातील लोकवस्ती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे नीरा उजवा कालव्यावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या गावातील लोकवस्ती व जनावरांसाठी धरणात पाणी प्राधान्याने राखून ठेवून ते प्रत्येक सप्ताहात कालव्याद्वारे सोडण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.