अंतिम टप्प्यात सिद्धाली शहांचा झंझावात; प्रचाराची मुदत संपण्यापूर्वीच मतदारांचा कौल भाजपलाच!


स्थैर्य, फलटण, दि. १९ डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज (गुरुवारी) संपणार आहे. प्रचाराची वेळ संपण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे सिद्धाली शहा आणि त्यांची यंत्रणा अंतिम क्षणापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे विरोधक मात्र अद्यापही सुस्त असल्याने या प्रभागात भाजपचा विजय आता केवळ औपचारिक मानला जात आहे.

आज सकाळपासूनच सिद्धाली शहा यांनी आपल्या समर्थकांसह प्रभागात जोरदार रॅली आणि पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. प्रचाराच्या या शेवटच्या दिवशी ‘घरोघरी संपर्क’ करण्यावर त्यांनी भर दिला असून, प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट आणि मारवाड पेठ परिसरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला महिला आणि तरुणांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद विरोधकांची झोप उडवणारा ठरला आहे.

या प्रभागातील सिद्धाली शहा यांच्या विरोधी उमेदवार, ज्यांनी यापूर्वी नगरसेवक पद भूषवले होते, त्या प्रचाराच्या अंतिम दिवशीही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागील कारकिर्दीत ठोस विकासकामे न झाल्याने आणि सध्याच्या प्रचारातील निरुत्साहामुळे मतदारांचा कल स्पष्टपणे कार्यक्षम आणि उच्चशिक्षित असलेल्या सिद्धाली शहा यांच्याकडे झुकला आहे. “विरोधकांचा प्रचार थंडावलेला असताना, सिद्धाली शहांचा झंझावात मात्र सुसाट आहे,” अशी चर्चा प्रभागात रंगली आहे.

विशेष म्हणजे, या प्रभागात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनाही मोठे समर्थन मिळत आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवत मतदार निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत.

प्रचाराची सांगता होण्यापूर्वीच प्रभाग क्रमांक ८ मधील वातावरण पूर्णपणे भाजपमय झाले आहे. विरोधकांची निष्क्रियता आणि सिद्धाली शहा यांनी मतदारांशी साधलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे येथे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आज रात्री प्रचाराच्या तोफा थंडावतील, पण त्यापूर्वीच सिद्धाली अनुप शहा यांनी मतदारांची मने जिंकली असून, २० तारखेला होणारे मतदान हे केवळ त्यांच्या विजयावर अधिकृत मोहोर उमटवण्यासाठीच असेल, असा विश्वास भाजप गोटातून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!