अखेर ‘किसन वीर’ च्या गव्हाणीत मोळी पडली कितीही संकटे आणली तरी जबाबदारी झटकणार नाही : मदन भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सातारा । किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरुच होणार नाही या चर्चांना फोल ठरवित अखेर गुढीपाडव्याला कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला. प्रत्येक ठिकाणी अडवणूक होवूनही सर्व संकटांवर मात करीत किसन वीरच्या गव्हाणीत मोळी पडली असून हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केला.

यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले म्हणाले, की आज गुढीपाडवा आहे. त्यामुळे कोणी कोणी काय काय उद्योग करुन हा हंगाम सुरुच होवू नये यासाठी प्रयत्न केले याबाबत बोलणार नाही. ते बोलण्याचा आजचा दिवस नाही. मात्र पुराव्यानिशी, कागदानिशी योग्य ठिकाणी बोलेन. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सहकार्य केले आणि हंगाम सुरु करता आला. मात्र त्यांच्याकडूनही मदत होवू नये यासाठी प्रयत्न केले गेले. मी जबाबदारीपासून पळून जाणारा नाही. सभासदांची एफआरपी असो, कामगारांचे प्रश्न असो कि कारखान्याबाबतचे इतर काही विषय असोत त्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी अखेरपर्यंत पार पाडण्याचाच प्रयत्न करणार. शेतकऱ्यांना किती आणि काय काय सोसावे लागले, कामगारांना किती अडचणीतून जावे लागले याची जाणीव मला आहे. आम्हा सर्वांना जे भोगावे लागले त्यातून काहींना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गेली वर्षभर हंगाम सुरु होण्यासाठी धावपळ सुरु होती. सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी जिथं जिथं आवश्यकता होती तिथं तिथं गेलो. तिथे कमीपणा मानला नाही. शेवटी ही शेतकरी सभासदांच्या मालकीची संस्था आहे ती टिकली पाहिजे हाच विचार केला. मी जर खचलो तर या संस्थेचा गळा घोटण्यास चोवीस तासही लागणार नाहीत ही भीती असल्याने जिद्दीने पाय रोवून उभा राहिलो. त्यामुळेच आज हा गोड दिवस उशीरा का होईना उगवला. आजपर्यंतच्या वाटचालीत अशा अनेक अडचणींना अनेकदा सामोरा गेलो. पण उभ्या हयातील ना कधी सुडाचे राजकारण केले ना कारखान्यात राजकीय हेतूने कारभार केला. त्यामुळेच अनेक शेतकरी किसन वीरलाच ऊस घालणार या भूमिकेवर ठाम आहेत. निवडणुकीच्या काळात जे बोलायचे ते बोलेनेच पण डोंगरपायथ्याचा असो की खाचरातील असो सर्व उसाचे गाळप करण्यासोबत सर्व अडचणींवर आपल्या सर्वांच्या सहकार्याने मात करण्याचा प्राणप्रणाने प्रयत्न करेन, अशी ग्वाही मदन भोसले यांनी दिली.

प्रारंभी तोडणी कंत्राटदार बबनराव जाधव त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांताबाई जाधव या उभयतांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. ज्ञानदेव देवराम शेलार (भिवडी), सुरेश रघुनाथ जायकर (भुईंज), राहुल भिमराव वारागडे (वारागडेवाडी, भुईंज), पांडुरंग रामचंद्र आवळे (किकली), पांडुरंग गोविंद गोळे (जांब), राजेंद्र महादेव सुर्वे (खडकी) या कारखान्यासाठी जमीन देणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, प्रविण जगताप, प्रताप यादव-देशमुख, नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, शंकरराव पवार, शेखर भोसले- पाटील, संतोष जमदाडे, अमर करंजे, सुरेश पवार, विठ्ठल इथापे, आनंद जाधवराव, केशव पिसाळ, सुरेश चिकणे, अविनाश सावंत, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हणमंतराव निकम यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक नंदकुमार निकम यांनी आभार मानले.

एफआरपीही देणार
यावेळी शेतकऱ्यांच्या एफआरपीबाबत बोलताना मदन भोसले म्हणाले, शेतकऱ्यांच्या हक्काचे दाम देताना उशीर झाला आहे. त्याची सल काळजात काटा रुतल्याप्रमाणे सलत आहे. अनेकांना याचा आनंद झाला आम्ही मात्र त्यामुळे तीळ तीळ तुटलो. तसे असलो तरी हरलो मात्र नाही, की पळूनही गेलो नाही. जिद्दीने पाय रोवून उभे राहिलो आणि या जिद्दीतूनच शेतकऱ्यांचा पै ना पै दिल्याशिवाय राहणार नाही. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर अखेरच्या दिवसात प्रकृती ठिक नसतानाही शेतकरी, कामगारांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत या चिंतेत होते. अशा भावनेने आम्ही काम करतो. सर्व प्रश्न मार्गी लावून गजाननभाऊंना कृतीशील आदरांजली वाहू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!