दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यामध्ये नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा गतीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींचा गतीने निपटारा करावा. अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्यासाठी हा ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाने शेवटच्या नागरिकांपर्यंत सेवा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, यासाठी विभागनिहाय नोडल अधिकारी नेमला जाणार असून याबाबतचा दैनदिन आढावाही घेतला जाणार आहे, असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सांगितले आहे.