
स्थैर्य, सातारा, दि. 23 : जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव गंभीर होत चालला असून दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 57 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात जावलीतील पुनवडी, सातारा, कराड तालुक्याला दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रात्री 9.53 आलेल्या अहवालात 86 बाधित असून बुधवारी सायंकाळी आलेल्या दोन अहवालात 14 पॉझिटिव्ह आले आहेत. तर बुधवारी रात्री 105 जणाचे अहवाल बाधित आल्याने एकूण आकडा 121 इतका झाला.
दरम्यान कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रोहिणी उमेश शिंदे या कोरोना महामारीच्या काळात शहरवासियांना दिलासा देण्यासाठी सतत ऑन फिल्ड होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. लक्षणे दिसल्याने बुधवारी त्यांचा स्वॅब कृष्णा रूग्णालयात देण्यात आला. सायंकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
7 बाधितांच्या मृत्यू
जिल्हय़ात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या शंभराकडे वाटचाल करत आहे. बुधवारी आलेल्या दोन वेगवेगळय़ा अहवालात 7 मृत्यूची नोंद झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच मृत्युदरही वाढत आहे.
शारदा हॉस्पिटल कराड येथे बुधवार पेठ येथील 53 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे अहिरे (ता. खंडाळा) येथील 77 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा व सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आलेला गुरुवार पेठ सातारा येथील 72 वर्षीय पुरुषाचा अशा 3 जणांचा मृत्यू झाला. तर कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेतलेल्या तारुख (ता. कराड) येथील 65 वर्षीय पुरुष व एकसळ (ता. कोरेगाव) येथील 66 वर्षीय पुरुष तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बापूजी साळुंखेनगर कराड येथील 37 वर्षीय पुरुष व चेतळी (ता. खटाव) येथील 28 वर्षीय पुरुष अशा एकुण 4 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.