स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ३: सुरेश रैना अचानक आयपीएल सोडून भारतात परतल्याने वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने त्यावर मौन सोडले. माझे कुटुंब माझ्यासाठी आवश्यक आहे. मला चिंता होती, मला काही झाल्यास त्यांचे काय होईल. मी माझ्या मुलांना २० दिवसांपासून पाहिले नाही. भारतात परतल्यानंतर क्वारंटाइन असल्याने त्यांना भेटू शकलो नाही, असे रैनाने म्हटले. आता तो पुन्हा चेन्नईसाठी खेळणार नाही, अशी चर्चा होती. त्यावर रैनाने म्हटले, ‘सीएसके माझे कुटुंब आहे आणि माहीभाई माझासाठी सर्व काही आहे. हा कठीण निर्णय होता. माझा व सीएसकेमध्ये वाद नाही. कोणीही विनाकारण साडेबारा कोटी रुपये सोडणार नाही.’ त्याच्या मते तो, आणखी ४-५ वर्षे आयपीएल खेळू शकतो. तो संघासोबत पुन्हा जोडला जाऊ शकतो. संघाचे मालक एन. श्रीनिवासन वडिलांसारखे आहेत, नेहमी पाठीशी उभे राहतात. दुसरीकडे, रैना पुन्हा संघात येण्यावर श्रीनिवासन यांनी म्हटले की, त्यावर महेंद्रसिंग धोनी व संघ व्यवस्थापन निर्णय घेईल.