इंधन दरवाढ कमी करा कोंग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन
स्थैर्य, सातारा, दि. 29 : जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योग धंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढावले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. ७ जून २०२० पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवारपर्यंतची ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रति लिटर ९.१२ रुपये तर डिझेलमध्ये ११.०१ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर ८७-८८ रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करुन देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असताना सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. सध्या हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये असे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहता पेट्रोल डिझेलच्याकिमती कमी करुन सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नी जातीने लक्ष घालून दिलासा द्यावा.