दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सध्या जिल्हा परिषदेत अभिलेख वर्गीकरणाचे काम सुरु आहे. या कामाचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिलेले आहेत. मात्र, काही विभागातील कर्मचाऱयांकडून साहेबांच्या आदेशाला कोलदांडा देत आपलाचा घोडा दामटण्याचा प्रकार सुरु होत आहे. अभिलेख वर्गीकरणामध्ये ज्यांच्याकडून कामच झाले नाही हे विभाग सीईओ विनय गौडा यांच्या रडारवर आहेत. त्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाचा समावेश आहे. त्यांना कामामध्ये हलगर्जीपणा का झाला. आपल्यावर का कारवाई करण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस बजावण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेत काही विभागातील टेबलवरील काही कर्मचारी सकाळी थंब केल्यानंतर सायंकाळीच थंब करायला येतात. तर काहीजण टेबलवर असूनही कामेच करत नाहीत. हालचाल रजिस्टरवर नोंद नसते. सातारा जिल्हा परिषदेत सध्या सुरु असलेल्या अभिलेख वर्गीकरणाचे काम हे कर्मचाऱयांच्या हिताचे असल्याचे सांगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कर्मचाऱयांना कामात हयगय करु नका असे आदेश दिले गेले होते. त्यानुसार कामास सुरुवातही केली गेली परंतु अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी काही विभागामधून कामच होत नसल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्या विभागात जावून बैठका घेतल्या असता त्या विभागातील काही कर्मचाऱयांकडून कामे होत नसल्याची बाब समोर आली. त्यावरुन त्यांनी त्या त्या विभाग प्रमुखांच्या समक्षच कानउघडणी केली. त्यावरुन ज्यांच्या ज्यांच्याकडून कामे होत नाहीत याची यादीच काढण्यात आली असून त्यानुसार त्यांच्यावर नोटीस बजावण्याकरता नोटीसा तयार करुन त्या नोटीसा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बजावण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे यावरुन जिल्हा परिषदेत कर्मचाऱयांमध्ये यावरुन नेमकी काय कारवाई करणार, नोटीसीला कसे उत्तर द्यायचे याचीच उलटसुलट चर्चा सुरु असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या रडारवर माध्यमिक, प्राथमिक आणि समाजकल्याण विभाग असल्याची चर्चा सुरु आहे.