दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील १९४२ ची चले जाव चळवळ व संयुक्त महाराष्ट्र लढा यांचे विचार केंद्र म्हणजे कॉ.वसंतराव आंबेकर यांचा सातारा येथील वसंत आश्रमातील इतिहास होय. हा इतिहास व वारसा जतन व्हावा. इथेच क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अनेक वर्षे आजारपणात त्यांनी आंबेकर कुटुंबियांनी सेवा केली आहे. त्यांचे इथेच वास्तव्य होते. इथेच अनेक आंदोलनाची रणनीती ठरत असे म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीतील विचार जागर होण्यासाठी कॉ. वसंतराव आंबेकर जन्मशताब्दी वर्ष हे विविध उपक्रम आयोजित करून साजरी करण्यात यावी असे आवाहान डाव्या चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी सातारा येथे बोलताना केले.
स्वातंत्र्य सैनिक कॉ वसंतराव आंबेकर जन्मशताब्दी समितीच्या वतीने वसंतराव आंबेकर जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आयोजित अभिवादन प्रसंगी शिवाजी राऊत हे आंबेकर निवास पोवई नाका येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. वसंतराव आंबेकर यांच्या पत्नी श्रीमती कमलताई आंबेकर (वय 93) या होत्या. शताब्दी समितीचे सचिव विजय मांडके व जेष्ठ पत्रकार बाळ आंबेकर हे विचारमंचावर उपस्थित होते.
प्रारभी कॉ वसंतराव आंबेकर यांच्या प्रतीमेस उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. समितीचे सचिव विजय मांडके यांनी जन्म शताब्दी वर्षात कॉ वसंतराव आंबेकर स्मृतीग्रंथ, कॉ वसंतराव आंबेकर यांचा जिवन परिचय करुन देणारा ग्रंथ , तसेच कॉ वसंतराव आंबेकर स्मृती प्रित्यर्थ डाव्या चळवळीतील कार्यकर्त्याचा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल तसेच वर्षभरात मान्यवरांची व्याख्याने आयोजीत करण्यात येतील व आंबेकर निवास हे प्रती सरकार व स्वातंत्र्य चळवळ विचार प्रेरणा अभ्यास केंद्र म्हणून जिल्ह्यातील नव युवकांसाठी विकसित करण्यात येईल असे संकल्प जाहीर केले.
जिल्ह्यातील डाव्या चळवळीचा विजय मांडके यांनी आढावा हि घेतला.कॉ.आंबेकर जन्मशताब्दी वर्ष हे आंबेकर कुटुंबीयांपेक्षा सर्व संघटना व चलवळी यांचे पुढाकाराने साजरी करण्यात येईल असा निर्धार व्यक्त केला.
जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील व वडील वसंतराव आंबेकर व साताऱ्यातील चळवळीच्या अनेक आठवणी सांगितल्या.
कॉ त्र्यंबक ननावरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील व कॉ व्हीं एन पाटील यांच्या १९५७ मधील समाजवादी पक्षाच्या निवडणुकांचा वृतात व संघर्षाचा इतिहास सांगितला. नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी कॉ वसंतराव आंबेकर यांच्या व त्यांचे वडील यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. ऍड विलास आंबेकर यांनी कॉ वसंतराव आंबेकर यांची जन्मशताब्दी हि सार्वजनिक साजरी करणाऱ्या संघटनांना आंबेकर कुटुंबीयांचे सर्व सहकार्य कायम राहील याची ग्वाही दिली.
शेवटी कॉ.वसंतराव आंबेकर को लाल सलाम तसेच कॉ. वसंतराव आंबेकर अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमास गणपतराव मोहिते बाळासाहेब देशमुख ,माजी नगरसेवक अमर गायकवाड , रवी पवार व सुजित आंबेकर ,आंबेकर कुटुंबीय नातेवाईक उपस्थित होते.