दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । फलटण । मौजे भिवरकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक अहिल्या भोजने व ज्ञानेश्वर कदम यांनी आपल्या बालचिमुकल्यांच्या मदतीने व समस्त पालक, शाळा व्यवस्थापन समिती व त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच लोक प्रतिनिधी यांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरामध्ये असणारी अडगळ नष्ट करून त्या ठिकाणी श्रमदानातून परसबागेची निर्मिती केली आहे. यामध्ये पालकांनी विशेषता महिला पालकांनी विशेष सहभाग घेऊन परसबागेच्या निर्मितीला आकार देण्याचं काम केलं. यावेळी पालकांच्या मध्ये उत्साह निर्माण झाला होता. वास्तविक पाहता शाळा हा समाजाचाच एक भाग आहे. अशावेळी शिक्षकांनी, पालकांनी व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.तीच याठिकाणी दिसून येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अहिल्या भोजने म्हणाल्या,” हे काम कोणाला दाखवण्यासाठी आम्ही करत नाही विद्यार्थ्यांमध्ये श्रम व शिक्षण यांचा मेळ घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.कोणतेही काम हलके नसते.त्या श्रमाला प्रतिष्ठा असते हे रुजवण्यासाठी प्रयत्न करतोय.माझे सहकारी शिक्षक कदम सर यात मोलाची मदत करत आहेत. सोबत शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य व सहभाग असल्यावर कोणतेही काम अशक्य नाही.”ही शाळा विडणी केंद्रात येत असून अतिशय प्रयोगशील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मुलांचा शैक्षणिक दर्जा ही उत्तम आहे.