दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान करून बळी राजाचे अर्थकारण बिघडविले आहे . महाबळेश्वर तालुक्यात दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले तर खटाव तालुक्यात हुसेनपूर येथे शंभर मेंढ्यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला . जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या मध्यम पावसाने रब्बी हंगामातील हरभरा कांदा तसेच द्राक्ष व डाळिंबांच्या बागांना चांगलाच फटका बसला आहे .
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी महसूल विभागाला गुरुवारी तातडीच्या सूचना दिल्या आहेत . खटाव कराड सातारा महाबळेश्वर पाटण खंडाळा इ तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तपशीलवार पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित झाल्याने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसासह बोचऱ्या थंडीने सर्वसामान्यांसह जनावरांनाही बेजार केले आहे. गारवा सहन करू न शकल्यामुळे खटाव तालुक्यातील हुसेनपूर येथील एका शेतकऱ्याची चाळीस मेंढर दगावली आहेत. लोणी येथील श्रीमंत शिंदे यांच्या शेतात चव्हाण यांनी आपली मेंढर थांबविली होती मात्र अचानक पावसाचा जोर वाढून ही मेंढर सुरक्षित रित्या हलविण्या पूर्वीच थंडीनं गारठली . महाबळेश्वर येथील खिंगर मेटगुताड भिलार तळदेव येथील दोन हजार हेक्टरच्या स्ट्रॉबेरीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे . जिल्ह्यात थंड हवामान आवश्यक असणाऱ्या हरभरा गहू स्ट्रॉबेरी द्राक्ष आंबा या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे . माण तालुक्यातील ऐंशी हेक्टरवरील डाळिंबाच्या फळ पिकांना अवकाळी चा फटका बसला आहे . पुणे मार्केट यार्ड भागात माणच्या डाळिंबांना साडेतीनशे रुपयांना भाव मिळत असताना पावसाने शेत कऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे . जिल्ह्यातील कांदा पिकावर करपा रोगाचाही प्रार्दुभाव या पावसाने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे
गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये बोचरी थंडी, झोंबणारा गार वारा, ढगाळ वातावरण, त्यात रिमझीम पाऊस अशी बिकट परिस्थिती असल्यामुळे ही जनावरे दगावली आहेत. दुभती जनावरं दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या मृत गायींचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक सहाय्य करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने खटाव भुईंज , चंचळी, वाई , कराड अशा वेगवेगळ्या ठिकाणी गारठल्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे तातडीने आर्थिक सहाय्य मिळावे अशी बळी राजाची अपेक्षा आहे . वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . सातारा तालुक्यातही सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे .