स्थैर्य, सातारा, दि. ०८ : सातारा जिल्ह्यात लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया विधी यासारख्या कार्यक्रमास 50 व्यक्तींपर्यंत सामाजिक अंतर ठेवून परवानगी देण्यात आली होती. तथापि या ठिकाणी गर्दी होत असल्याचे व सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने ही मर्यादा आता 20 व्यक्तींपर्यंत करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
याबाबतचे आदेशही निर्गमित करण्यात आले असून या आदेशानुसार लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया सारख्या कार्यक्रमांना फक्त 20 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधू/वर वगळून इतर व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील व्यक्तींना अशा प्रकारच्या कार्यक्रमांना बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाबंदी असल्यामुळे प्रवासी असलेल्या कोणत्याही बसेस यांना इतर जिल्ह्यातून कोणत्याही कारणास्तव सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास मनाई घालण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी खाजगी बसेस या सुविधेतून वाहतूक करणारे कोणतही प्रवेश पास वितरीत करण्यात येवू नयेत, असे या आदेशात नमुद आहे.