
दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२२ । सातारा । दागिने साफ करण्याच्या बहाण्याने मायलेकींना दोघा भामट्यांनी ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. दोघा चोरट्यांनी हातचलाखी करून दागिने स्वतःजवळ ठेवले. त्या बदल्यात त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरून मायलेकींच्या हाती दिले. ही खळबळजनक घटना साताऱ्यातील चिमणपुरा पेठेमध्ये घडली आहे.
साताऱ्यातील ढोणे कॉलनी, चिमणपुरा पेठेमध्ये दीक्षा सागर कदम (वय २५) या वास्तव्यात आहेत. दि. ६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या घरामध्ये दोन अनोळखी तरुण आले. या तरुणांनी त्यांना दागिने साफ करून देतो, असे सांगितले. त्यामुळे दीक्षा कदम यांनी त्यांची पाच ग्रॅमची अंगठी आणि त्यांच्या आईची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्या दोघांजवळ दिली. चोरट्यांनी हे दागिने एका भांड्यात ठेवून त्यावर पावडर टाकली. काही क्षण त्यांनी दागिने साफ करत असल्याचे भासवले. त्यानंतर हातचलाखी करून त्यांनी भांड्यातील दागिने स्वतःजवळ काढून ठेवले. त्या बदल्यात त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत दगड भरले. ही पिशवी दिक्षा कदम यांच्याजवळ त्यांनी दिली. त्यानंतर संबंधित चोरटे तेथून निघून गेले. काही वेळानंतर कदम यांनी प्लास्टिकची पिशवी उघडली असता त्या पिशवीमध्ये दगड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी शेजारी पाजाऱ्यांना सांगून कॉलनीमध्ये चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन आजूबाजूच्या परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. परंतु पोलिसांनाही चोरटे सापडले नाहीत.