स्थैर्य, सातारा, दि. २८ : पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिलेले आहेत. त्याच प्रमाणे सातारा जिल्ह्यातही तातडीने तालुकास्तरावर जम्बो रुग्णालयाची उभारणी करावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियाद्वारे करीत आहेत.
पुणे येथे नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्टअखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. याच पद्धतीने पुणे जिल्ह्यातील उपाययोजनांची माहिती घेऊन सातारा जिल्ह्यातही कोरोनासाठी तातडीने जम्बो रुग्णालयाची उभारणी करावी, अशी मागणी सातारकर करीत आहेत.