दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । औंध । मागील काही दिवसांपूर्वी ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याने खटाव,कोरेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून या कारवाईच्या निषेधार्थ चर्चा करण्यासाठी आ.शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 19 रोजी वडूज येथे बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती माजी सभापती व पंचायत समिती सदस्य संदिप मांडवे यांनी दिली.
वडूज सातेवाडी येथील मधुमाला मंगल कार्यालयात ही बैठक आज दुपारी एक वाजता आयोजित केली जाणार आहे. खटाव तालुक्यासह जरंडेश्वर कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, याबाबत शेतकर्यांशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, मुंबई कूषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब सोळस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. याबाबत ही केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती ही संदिप मांडवे यांनी दिली.