फोटो फ्रेममेकर, सेंटरिंग व्यवसाय,शेतकरी व वाहन चालक काम करणाऱ्यांची मुले ठरली अव्वल
स्थैर्य,पिंपोडे बुद्रुक,दि.२ (रणजित लेंभे) : सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं,उच्च शैक्षणिक वातावरण नाही,मोठ्या क्लासचा बडेजावं नाही,अनेक गैरसोयीवर मात करतं,गुणांच्या स्पर्धेत सामान्य कुटुंबातील मुलांनी विद्यालयाच्या गुणवंत यादीत चमकण्याची किमया करुन दाखवली आहे.फोटो फ्रेम मेकरच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत विद्यालया बरोबर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनिशा जगन्नाथ लेंभे हिनें ९५.४० टक्के गुण संपादन केले आहेत.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा या वर्षीचा दहावीचा निकाल ९७.८० टक्के लागला आहे. परंतु गुणवत्ता यादीत प्रथम चार क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानाच्या यशाची झालर वेगळीच आहे ! मार्क्सच्या स्पर्धेमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक माहितीवर बारकाईने लक्ष्य असणारे शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर,नोकरदार किंवा उत्तम व्यवसायिक यांच्या मुलांनी यश मिळवले तर त्यांच्याकडे सुख सुविधासह दिशादर्शक साधन म्हणून पाहिले जाते.परंतु हीच किमया सर्व सामान्य कुटुंबातील,ज्यांच्या घरी शैक्षणिक वारसा व वातावरण नाही,अशा मुलांनी नुसते प्राविण्य मिळवले तरी त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनाला भिडतो,मात्र गुणवत्ता यादीत नावं झळकले आणि त्यांच्या पुढे आकाश ठेंगणे झाले आहे. याला उपजत कुशाग्र बुध्दी व विद्येची खाण म्हंटल तर वावगं ठरणार नाही ! प्रतिकूल परिस्थितीवर मात करतं असामान्य किमया येथील विद्यार्थ्यानी करुन दाखवली आहे. चारही कुटुंबाची परिस्थिती मध्यमच आहे.तिन्ही मुलांचे पालक बारावीच्यापुढे शिकलेले नाहीत मात्र उपजत बुद्धीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर गुरुवर्यांच्या योग्य मार्गदर्शन बरोबर आणि मुलांच्या बरोबरीनें आईनें घेतलेले कष्टाच्या जोरावर एवढे मोठे यश मिळवू शकता हा इतर पालकांपुढे प्रेरणादायी वस्तुपाठच उभा केला आहे.केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनिशा जगन्नाथ लेंभे हिचे वडील फोटो फ्रेम मेकर व्यवसायिक व शेती करतात, केंद्रात व विद्यालयात दुसरा क्रमांक मिळवणारा हर्ष किसनराव लेंभे याने ९४.२० टक्के गुण मिळवले आहेत. अतिशय शांत व नम्र असणाऱ्या हर्षचे वडील बांधकाम इमारतीचे सेंटरिंगचे काम करत आहेत. तिसरा क्रमांक मिळवणारी प्राची बाळासाहेब लेंभे हिने ९४ टक्के गुण मिळवणाऱ्या प्राचीचे वडील खाजगी गाडीवर वाहनचालक, घरगुती दुध विकत आहेत,चौथा क्रमांक मिळवणारा मयुर नानासो धुमाळ ९४ टक्के गुण मिळवणाऱ्या मयुरचे वडील शेतकरी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या आई गृहिणी आहेत.अशी सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांनी गुणवत्ता यादीत देदीप्यमान कामगिरी केली आहे.याच बरोबर विद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांना ९० टक्केच्यावर गुण मिळवले आहेत.यामध्ये गौरी घाडगे ९२ टक्के,दिक्षा भागवत,शेख मुस्कान,आस्वारी सोनवणे तिघींना ९०.२० तर श्रुतीका लेंभे हिला ९० टक्के गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.येथील सामाजिक,क्रिडा,शैक्षणिक व सांस्कृतीक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पिंपोडे जिमखाना असोसिएशनच्यावतीने प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचे,पालक व शिक्षकांचा घरी जाऊन शाल, श्रीफळ,पेढे, बुके देऊन दरवर्षी सन्मान केला जातो,या ही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन करीत या मुलांचा सत्कार करण्यात आला.धवल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थ आणि विविध संस्थानी सुध्दा अभिनंदन व कौतुक केले आहे.यशस्वी निकालाबाबत विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस.भोसले यांचा तर पर्यवेक्षक विजय चव्हाण सरांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.असोसिएशनचे संस्थापक दत्तात्रय पवार, मार्गदर्शक विठ्ठलराव धुमाळ, अध्यक्ष संदीप कदम,सचिव सचिन लेंभे,दिगंबर निकम, रणजित लेंभे,अमोल कांबळे, दिगंबर लेंभे,अभिजीत लेंभे, तानाजी जगदाळे,अमोल निकम अमित निकम,अमित वाघांबरे पदाधिकारी उपस्थित होते.