
दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार आज फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केला आहे. या गुन्हेगाराकडून पोलिसांनी एकूण ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कामगिरीमुळे फलटण शहर पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ जुलै २०२३ रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील दुचाकीवरून काळुबाईनगर, मलटण येथे जात असताना वरील आरोपीने फिर्यादीची मोटारसायकल अडवून लिफ्ट मागितली; परंतु फिर्यादीने नकार देताच आरोपीने फिर्यादीस खाली पाडून मारहाण करून फिर्यादीच्या बॅगमधील ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व फिर्यादीची मोटारसायकल घेऊन पसार झाला.
हा गुन्हा फलटण शहर पोलिसात दाखल झाल्यानंतर तपासाठी खास पथकाची नेमणूक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचे वर्णन, तांत्रिक माहितीच्या आधारे व बातमीदारांमार्फत आरोपीचा शोध घेऊन तुषार उर्फ गद्या संजय ननवरे (वय २१, रा. झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण) याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपी ननवरे याचा शोध घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल सुमारे ९० हजार ५०० रुपयांचा आरोपीकडून जप्त केला आहे.
या गुन्ह्यातील अटक आरोपी याची सध्या पोलीस अभिरक्षा मंजूर असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पो.ह. धायगुडे, धापते, वाडकर, काळुखे, जगताप, नाळे आदींनी केली आहे.