
दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२३ | फलटण |
फलटण विभागातून मागील पाच वर्षात एकूण ३५६ ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले आहेत. तसेच अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडींगमुळे जळाले आहेत. हे चोरीला गेलेले व जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मागील पाच वर्षात २८७ ट्रान्सफॉर्मर आले. मात्र, १०० केव्हीचे ५८ ट्रान्सफॉर्मर कमी मिळाले होते. ट्रान्सफॉर्मरच्या कमतरतेमुळे ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी वेळ लागत होता. ही बाब संबंधित अधिकार्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. खासदारांनी लगेचच या बाबीचा ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केला व ट्रान्सफॉर्मरची मागणी केली. त्यानुसार ऊर्जा विभागाकडून एकाच दिवसात ट्रान्सफॉर्मर फलटणमध्ये दाखल झाले आहेत. याबद्दल वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी व शेतकर्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
याबाबतीत वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकर्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केल्या होत्या. त्यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत ऊर्जा विभागाला सदर ५८ ट्रान्सफॉर्मरची मागणी खासदारांनी केली होती. ऊर्जा मंत्रालयातील आयुक्त, संचालक यांनी त्वरित सदर मागणीची पूर्तता करून फलटण विभागाला तात्काळ ५८ ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी करताच हे ट्रान्सफॉर्मर मिळाल्याने फलटण तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण विभागात साहित्य व ट्रान्सफॉर्मर व इतर बाबी उपलब्ध होत नव्हत्या. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नुकतीच केंद्रीय ऊर्जा विभागाच्या कमिटीमध्ये निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असल्याने त्यांनी महावितरणला ट्रान्सफॉर्मर व इतर सामग्री उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सर्व वायरमन लोकांनी सत्कार करून आभार मानले.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अभिजित नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव व इतर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व वायरमन उपस्थित होते.