फलटण विधानसभा मतदारसंघात प्रमुख तीन उमेदवारांचे अर्ज वैध, तर दोन अर्ज बाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया सुरू होती. यामध्ये दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले तर प्रमुख तीन उमेदवारांनी एकमेकांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकती घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी यांच्या कक्षात तब्बल तीन तास सुनावणी सुरू होती. यामधील तिन्ही प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून इतर दोन उमेदवारांचे अर्ज मात्र बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या जात प्रमाणपत्रावर विरोधी उमेदवारांनी हरकत घेतली तर रासपचे उमेदवार दिगंबर रोहिदास आगवणे यांच्या स्वयंघोषणापत्रात काही माहिती लपवल्याचा आक्षेप इतर उमेदवारांनी घेतला होता, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या अर्जावर काही तांत्रिक आक्षेप घेण्यात आले होते. तीन तासांच्या सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले. मात्र, गौतम वामन काकडे व भीमराव विठ्ठल बाबर यांचे अर्ज अपूर्ण माहिती भरल्याने बाद करण्यात आले आहेत.

दरम्यान, तिन्ही प्रमुख उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती घेतल्याने फलटण निवडणूक कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल तीन तास सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर तिन्ही पक्षाचे उमेदवार यांच्या वकिलांनी बाजू मांडली असून यामधील तिन्ही अर्ज वैध झाले आहेत.


Back to top button
Don`t copy text!