
स्थैर्य, नागपूर, दि.२५ : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता नागपुरात कठोर नियम लागू करण्यात येत आहेत. येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. नागपुरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी याबाबतचे सुधारीत आदेश जारी केले आहेत.
त्याशिवाय नागपुरातील ग्रंथालयं, अध्ययन कक्ष, स्वीमिंग पुलंही बंद राहणार आहेत. तसेच, आजपासून मंगल कार्यालयं, लॉनमधील लग्न समारंभाला प्रतिबंध घालण्यात आला आहे.
नागपुरात कोरोना पुन्हा ब्लास्ट
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा एकदा ब्लास्ट झालाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1181 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 7184 वर पोहोचलीय. तरीही लोकं मात्र सुधारायला तयार नाहीत. नागपूरच्या बर्डी फुलबाजारात कोव्हिडचे नियम धाब्यावर बसवून लोक सर्रास वावरत होते. इथे काहींनी मास्क घातला नव्हता, तर सोशल डिस्टन्सिंगचा सर्रास फज्जा उडाला होता.
नागपूर पोलीस दलात आठ वारसांना मिळाली नोकरी
राज्य पोलीस दलाने आदर्श घालून दिला आहे. कोरोनात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, नागपूर पोलीस दलात आठ वारसांना नोकरी मिळाली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आठ वारसांची नागपूर पोलिसांत पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुणाला तीन महिन्यात, तर कुणाला सहा महिन्यात नोकरी मिळाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आलं आहे.
पोलिसांच्या एकूण 31 वारसांना पोलीस दलात नोकरी मिळणार आहे. यामुळे कोरोनात खचलेल्या पोलीस कुटुंबीयांना पुन्हा आधार मिळाला आहे.