दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकताच त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. क्रिकेटचा देव असलेला सचिन खऱ्या आयुष्यात गरीब मुलांसाठी देवच ठरला आहे. २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्याने अनेक सामाजिक कार्य केले आहेत. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन मध्य प्रदेश येथील संदालपूर गावात शाळा बांधणार आहे.
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातल्या खाटेगाव तालुक्यातील या गावात सचिन तेंडुलकर फाऊंडेशन पोहोचले आहे. २०११ च्या आकडेवारी नुसार या गावाच्या साक्षरतेचं प्रमाण कमी आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने तेथे शाळा बांधण्याचा आणि पुढील दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक येथील व आसपासच्या जवळपास २३०० मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने ही शाळा तेंडुलकरच्या पालकांना समर्पित केली आहे.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठमोठे विक्रम नोंदवले आहेत. १०० आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर २०० कसोटीत १५९२१, ४६३ वन डेत १८४२६ धावा आहेत.