11 जण जखमी : दोन्ही गटातील 17 जणांना अटक
स्थैर्य, सातारा, दि. 26 : मणकर्णवाडी, ता. माण येथे दि. 25 रोजी शिवीगाळीच्या कारणावरून दोन सशस्त्र गट एकमेकांना भिडले. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील 11 जण जखमी झाले. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसानी दोन्ही गटाच्या 17 जणांना अटक केली आहे.
याबाबत विठ्ठल महादेव जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारास मणकर्णवाडी गावच्या हद्दीत दि. 25 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास आकाश नारायण मोहिते यास फिर्यादीने आकाश नारायण मोहिते याच्या वडिलांनी आपणास शिवीगाळ का दिली, असा जाब विचारला. त्याचा राग मनात धरून बाळकू अवबा मोहिते, नारायण अवबा मोहिते, आप्पासो अवबा मोहिते, लालासो अवबा मोहिते, किरण नारायण मोहिते, आकाश नारायण मोहिते, दत्तात्र्यय बाळकू मोहिते, सूनील बाळकू मोहिते, अनिल बाळकू मोहिते, मल्हारी अप्पासो मोहिते, ज्योतीराम अप्पासो मोहिते या सर्वांनी आज तुझे खानदान संपवतो, खल्लास करून टाकतो, असे म्हणून कुर्हाड आणि काठ्यांनी जबर मारहाण केली. फिर्यादी तसेच फिर्यादीचे वडील महादेव कृष्णा जगदाळे, मूले सूनील व अमोल, भाऊ दशरथ यास डोक्यात, पोटात, पायावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. या फिर्यादीनुसार वरील सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच लालासो आवबा मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महादेव कृष्णा जगदाळे, सुनिल विठठल जगदाळे, विठठल महादव जगदाळे, दशरथ महादेव जगदाळे, अमोल विठल जगदाळे, उज्चला विठदल जगदाळे सर्व रा. मनकर्णवाडी ता. माण यांनी आजकाल तुम्हाला लय मस्ती आली आहे. तुम्हाला आज खल्लासच करतो असे म्हणून फिर्यादी व फिर्यादीचे भाऊ बाळकु, पुतण्या मल्हारी, जोतीराम आणि किरण यांच्या डोक्यात, खांद्यावर, पाठीवर, हातावर कुर्हाडीने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. या फिर्यावरून वरील सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 17 जणांना अटक केली आहे.