दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । जिल्हा बँक निवडणुकीच्या दिवशी मेढा येथिल मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू रुशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. दोन्ही गटात यावेळी काही वेळासाठी राडा झाला .
यावेळी वसंतराव मानकुमरे हे आक्रमक झाले. रांजणे यांच्या पत्नी सौ अर्चना रांजणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ऋषिकांत शिंदे यांनी वसंतराव मानकुमरे व कुडाळचे प्रतापगड कारखाना संचालक मालोजीराव शिंदे यांना हातवारे करून एकमेकांना धारेवर धरले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार शिंदे व रांजणे दोघांनीही मध्यस्थी करून कार्यकर्त्यांन शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले.
जिल्हा बँकेच्या राजकारणात जावली तालुक्यातील राजकीय आंतरविरोध कमालीचे ताणले गेले आहेत . त्याचा प्रत्यक्ष परिणाम येथील मतदान केंद्रावर पहायला मिळाल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली .ऋषिकांत शिंदे हे आपल्या समर्थकांसह मतदान केंद्रावर दाखल झाल्याने वसंतराव मानकुमरे यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला . ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे या सुध्दा आक्रमक झाल्या . शिंदे व रांजणे गटाचे दोन्ही समर्थक आमनेसामने आल्याने जोरदार वादावादी सुरू झाली . आम्हाला विनाकारण रोखले जात असल्याची तक्रार यावेळी काही कार्यकर्त्यांनी केली . आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांनी स्वतः पुढे येऊन समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले . शशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून मतदान केंद्रावर कोणताही तणाव वाढणार नाही याची ग्वाही पोलिसांना दिली.