हिंगणगावात आज रणजितसिंहांची तोफ धडाडणार; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर ‘महायुती’चा झेंडा फडकवण्यासाठी दिग्गज एकवटले!


स्थैर्य, हिंगणगाव, दि. ०४ फेब्रुवारी : फलटण तालुक्यात विधानसभेला आमदार सचिन पाटील आणि नगरपालिकेला समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाने सुरू झालेली परिवर्तनाची लाट आता ग्रामीण भागात पोहोचली आहे. सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) दुपारी ३.३० वाजता हिंगणगाव येथे ‘महायुती’ची भव्य जाहीर सभा पार पडत आहे.

या सभेला भाजपचे फायरब्रँड नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर संबोधित करणार असून, त्यांच्या जोडीला फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील आणि नुकतेच नगरपालिकेवर सत्ता मिळवणारे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हिंगणगावात आज नक्कीच विरोधकांचा खरपूस समाचार घेतला जाणार, हे निश्चित मानले जात आहे.

हिंगणगाव गटावर महायुतीचे विशेष लक्ष

या सभेच्या माध्यमातून हिंगणगाव गटातील महायुतीचे उमेदवार सौ. किरण निलेश नलावडे (सातारा जिल्हा परिषद, हिंगणगाव गट), श्री. संतोष हणमंत खताळ (पंचायत समिती, सासवड गण) आणि सौ. सीमा सुरेश भोईटे (पंचायत समिती, हिंगणगाव गण) यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रणजितसिंहांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही उमेदवारांची विजयाकडे घोडदौड सुरू असल्याचे चित्र आहे.

दिग्गजांची मांदियाळी या सभेसाठी केवळ रणजितसिंहच नव्हे, तर महायुतीचे सर्व प्रमुख शिलेदार एका मंचावर येत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, ॲड. नरसिंह निकम आणि विलासराव नलवडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विधानसभेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही विरोधकांना अस्मान दाखवण्यासाठी महायुती सज्ज झाली असून, आजची सभा हिंगणगावच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!