दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । कराड । येणके ता. कराड येथील इनाम शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूराचा मुलगा ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. ऊस तोडणीसाठी निघालेल्या ऊस कामगार टोळीतील 5 वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. संबंधित चिमुरड्याला रस्त्यावरून उचलून उसाच्या शेतात नेत त्याच्या नरड्याचा चावा घेत ठार केले. या घटनेनंतर वनविभागाविरोधात येणके व परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आकाश दिगांश भिल (वय 4, रा. कात्रा, ता. धडगाव, जि. नंदूरबार) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार जिल्ह्यातील कात्रा येथील ऊस तोडणी कामगारांची काही कुटुंबे येणके येथे ऊस तोडणीसाठी आली आहेत. सोमवारी सकाळी 7 च्या दरम्यान रयत सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडणीचे काम करणार्या टोळीमध्ये दिगांशा गेदा भिल व चिन्या दिगांशा भिल हे पती पत्नीचे जोडपे ऊस तोडणी मजूराचे काम करत होते. ते अन्य मजुरांबरोबर ऊस तोडणीसाठी येणके-किरपे रस्त्याने निघाले असता चिन्या भिल ही महिला इतरांच्या पाठीमागे काही अंतरावरून आपल्या लहान मुलाला कडेवर व आकाशला बरोबर घेऊन चालत निघाली होती. त्यावेळी इनाम नावाच्या शिवाराजवळ उसाच्या शेतीतून अचानक बिबट्याने झेप घेऊन आईच्या समोरच आकाशची मान जबड्यात पकडून ऊसाच्या शेतात धुम ठोकली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. तेव्हा ऊसतोड टोळीतील कामगार व स्थानिक ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यांनी उसाच्या शिवारात शोधाशोध सुरू केली असता आकाशला सोडून बिबट्या पळून गेला. पण तोपर्यंत नरड्यातून रक्तस्त्राव होऊन आकाश मयत झाला होता. घटनेची माहिती मिळताच येणकेसह परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकरी यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. उपस्थित जमावाने आक्रमक होत वनविभागाच्या कार्य पद्धतीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दरम्यान, स्थानिक नागरिक तसेच रयत साखर कारखान्याच्या कर्मचार्यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच जिल्हा उपवन अधिकारी महादेव मोहिते, कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले, कोळे वनपाल बी. सी. कदम, मलकापुरचे वनपाल सवाखंडे, कोळ्याचे वनरक्षक राठोड, मलकापूरचे वनरक्षक रमेश जाधवर, म्हासोलीचे वनपाल सुभाष गुरव, वनमजूर अरूण शिबे, मयुर जाधव अन्य कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्या नंतर वनविभागाच्या येणके येथील कार्यक्षेत्रात स्थानिक ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
कुटुंबियांना 15 लाखांची मदत : महादेव मोहिते
मृत बालकाच्या कुटुंबियांना शासन नियमानुसार 15 लाख रूपये भरपाई देण्यात येणार आहे. संबधितांचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक दिल्यानंतर त्यात तातडीने 5 लाख रूपये वर्ग करू. उर्वरित 10 लाख रूपयेही संबधितांच्या बँक खात्यात परस्पर वर्ग केले जातील, असे सातारा जिल्हा उपवन अधिकारी महादेव मोहिते यांनी सांगितले.