दैनिक स्थैर्य । दि. १० फेब्रुवारी २०२३ । सातारा । बाल विवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारिरीक आरोग्यावर दुष्परीणाम होतात. बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून असे विवाह होत असल्यास महिला व बाल विकास कार्यालयाशी व पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी केले.
येथील ज्ञानदीप विद्यामंदिरात बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. तावरे बोलत होते. या प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) दीपक ढेपे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, चाचा फौंडेशनच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. हेमलता हिरवे यांच्यासह अंगणवाडी सेविका, महिला उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविकांनी बाल विवाहाच्या दुष्परीणामाबाबत समाजामध्ये जनजागृती करावी, असे सांगून श्री. तावरे म्हणाले, अंगणवाडी सेविका राज्य शासनाच्या विविध योजना सक्षमपणे समाजापर्यंत पोहचवित आहेत. कुठे बाल विवाह होत असल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव हे गुप्त ठेवले जाते. बाल विवाह झाल्यास यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशांवर कायदेशीर करवाई होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे बाल विवाहाच्या अनेक तक्रारी येत आहेत. समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात येत आहे. बाल विवाह करणे म्हणजे मुलांच्या आयुष्य धोक्यात घालणे आहे. ही जाणीव समाजात रुजविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे श्री. ढेपे यांनी प्रास्ताविकात सांगितले.