स्थैर्य, कातरखटाव, दि. 31 : बनपुरी ( ता खटाव) येथे दोन दिवसांपूर्वी राजस्थान मधील कोटा शहरातून गावी आलेल्या एका तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असतानाच शनिवारी रात्री आणखी पाचजनांचे अहवाल कोरोना बाधित आल्याने परिसरात चिंता वाढली असून एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी : १६ तारखेस राजस्थानमधील कोटा शहरातून सुमारे बावीस जण खटाव तालुक्यात दाखल झाले आहेत. या मध्ये बनपुरी , येरळवाडी, दातेवाडी , तरसवाडी, कदमवाडी , मायणी येथील लोकांचा समावेश असून बनपुरी वगळता इतर प्रवाशांना मायणी येथे कोरंटाईन केले होते. बनपुरी मधील त्या प्रवासी लोकांना शाळेत कोरंटाईन करण्यात आले. यामध्ये एक 38 वर्षीय युवक व त्याचे कुटुंबीय शाळेत कोरंडटाईन न राहता स्वताच्या घरामध्येच कोरंटाईन होउन राहीले होते. यामध्ये हा युवक बुधवारी कोरोना बाधीत असल्याचे निदर्शनास आले. हा युवक बाधीत असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची व निकटच्या सहवासात असणा-या लोकांची तपासणी चालु होती. यामध्ये या युवकाची दोन मुले, पत्नी, आई, वडील व कोटा येथून आलेले बनपुरी येथिलच सहप्रवासी अशा तेरा जणांचे घशाचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये आई वडील व इतर काही प्रवासी वगळता पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बनपुरी व परिसरात खळबळ उडाली आहे.
घराच्या वरच्या मजल्यावर या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती. सख्खे आणी चुलत भाउ असे मिळून अकरा माणसांचे कुटंब राहात होते. गेल्या सात दिवसापुर्वी खोकल्याचा व जुलाबाचा त्रास होउ लागल्याने कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला होता. त्यामुळे गावातील व संपर्कात आलेल्या सर्व लोकांची आरोग्यविभागाकडून तपासणीचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे बनपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसीलदार डॉ अर्चना पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ युनूस शेख, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदी कोरोना कमेटीतील अधिकाऱ्यांनी गावास भेट दिली असून परिसर सील करण्यात आला आहे.