स्थैर्य,औरंगाबाद, दि.१८: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्यामुळे चिंताही वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. औरंगाबादेतही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळेच 28 फेब्रुवारीपर्यंत ही सूट दिली असून गरज पडल्यास ती आणखी वाढवली जाणार असल्याचे आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
शिवजयंतीची मिरवणूक काढल्यास गुन्हा
दरम्यान, उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी राज्यभर उत्साहाचे वातावरण असते, पण वाढत्या कोरोनामुळे मोठा कार्यक्रम न करण्याचे आवाहान राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्याच्या शिवजयंती निमित्त सर्व मंडळाशी चर्चा करण्यात आली असून शहरात मिरवणुकीवर बंदी असून मिरवणूक काढल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मास्क न घालणाऱ्या वर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.