
2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागा जिंकत रामराजेंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मात्र, 2026 च्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले आहे. विधानसभेसह नगरपालिकेतील ‘रणजितसिंह पॅटर्न’मुळे आगामी लढत ‘काटे की टक्कर’ होणार! वाचा सविस्तर रिपोर्ट…
स्थैर्य, फलटण, दि. 16 जानेवारी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आणि फलटण तालुक्याच्या राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा ‘दंगल’ सुरू झाली आहे. मात्र, यावेळी परिस्थिती 2017 सारखी मुळीच नाही. 2017 च्या निवडणुकीत विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ‘एकहाती सत्ता’ आणि ‘करिश्मा’ दिसून आला होता. पण 2026 च्या उंबरठ्यावर आता परिस्थितीने 180 अंशात वळण घेतले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजे गटाला दिलेले ‘जोरदार धक्के’ पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही अस्तित्वाची आणि अटीतटीची लढाई ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.
2017 चे चित्र: रामराजेंचा ‘एकहाती’ करिश्मा
फ्लॅशबॅक 2017 मध्ये डोकावले तर दिसते की, त्या सार्वत्रिक निवडणुकीत फलटण तालुक्याने तत्कालीन (एकत्रित) राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मते दिली होती. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 जागांवर, तर पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवत सलग सहाव्यांदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. यामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर आणि शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजय मिळवले होते. त्यावेळी केवळ गिरवी गटात काँग्रेसच्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचा विजयरथ रोखला होता. सद्यस्थिती: आज श्रीमंत रामराजे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले, तरी त्यांचा संपूर्ण गट हा ‘शिवसेना’ (शिंदे गट) सोबत आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वीच रामराजेंच्या उपस्थितीत या गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
2025 चे वास्तव: रणजितसिंहांचा ‘मास्टरस्ट्रोक’
गेल्या काही वर्षांत बाणगंगा व नीरा नदीतून आणि फलटणच्या राजकारणातून बरेच पाणी वाहून गेले आहे. 2017 साली राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर 2018 मध्ये भाजपमध्ये गेले आणि 2019 ला खासदार झाले. 2024 च्या लोकसभेत रामराजेंनी सातारा-सोलापूरच्या विरोधकांची मोट बांधून रणजितसिंहांचा पराभव केला. मात्र, या पराभवाने खचून न जाता रणजितसिंह पेटून उठले. त्यानंतरच्या काही महिन्यांतच त्यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ लगावले: 1. विधानसभा: आमदार सचिन पाटील यांना प्रचंड ताकदीने निवडून आणले. 2. नगरपालिका: रामराजेंचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव करत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. या विजयांमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात आपली ताकद निर्माण केली आहे.
दिग्गजांची बंडखोरी आणि ‘इन्कमिंग’चा जोर
2017 मध्ये जे दिग्गज नेते आणि पदाधिकारी रामराजेंचे ‘शिलेदार’ म्हणून ओळखले जात होते, त्यातील अनेक माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गोटात (खासदार गट) दाखल झाले आहेत. त्यामुळे रामराजेंना आपला 30 वर्षांचा बालेकिल्ला राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत, तर रणजितसिंह ‘नंबर वन’ होण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत.
फ्लॅशबॅक 2017: विजयी उमेदवारांचा ‘रिपोर्ट कार्ड’
2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विरोधकांचे पानिपत केले होते. त्यावेळी कोणाला किती मते मिळाली आणि विजयाचे मताधिक्य काय होते, याचा हा सविस्तर रिपोर्ट खालीलप्रमाणे:

