स्थैर्य, मुंबई, दि. 18 : आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्ण भारत यासाठी दिलेली हाक, त्यापाठोपाठ पाच दिवस उचललेल्या ऐतिहासिक पावलांची शृंखला भारताच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा म्हणून स्मरणात ठेवली जाईल,असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
केंद्रीय वित्तमंत्र्यांनी पाच भागामधे जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर पॅकेजवर ते प्रतिक्रिया देत होते. संकट हे देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची एकापेक्षा अनेक पद्धतीने परीक्षा घेत असते. या परीक्षेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकर आणि निर्णायक कृती करत एक उदाहरणच घालून दिले असे ते म्हणाले.
गतीमान नेतृत्व तातडीच्या आव्हानावर विचार करण्याबरोबरच देशाला पूर्वीपेक्षा अधिक बळकट करण्यासाठी सज्ज करते, असेही ते म्हणाले. भारताच्या यशोगाथेसाठी महत्वाच्या असलेल्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सुधारणा आणण्यात आल्या आहेत.गरीब, फेरीवाले,स्थलांतरित मजूर, भारताच्या विकासाचे सुकाणु ज्यांच्या हाती आहे अशा या सर्वांसाठी अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.एक देश एक रेशन कार्ड ते सर्व स्थलांतरितांना मोफत अन्नधान्य, अल्प कर्ज घेतलेल्या मुद्रा लाभार्थीसाठी व्याजदरात सवलत ते फेरीवाल्यांसाठी प्राथमिक खेळते भांडवल, मनरेगा तरतुदीसाठी चालना ते आरोग्य आणि वेलनेस केंद्र सबलीकरण, कोविड-19 चा सर्वात जास्त आर्थिक फटका झेलणाऱ्याना उभारी देऊन त्यांना बळकट करण्यावर या आर्थिक पॅकेज मधे भर देण्यात आला आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग किंवा एमएसएमई क्षेत्र हे या क्षेत्रांच्या रोजगारविषयक स्वरूपामुळे महत्वाचे असून भारताच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचे क्षेत्र आहे. कोणत्याही तारणाशिवाय एमएसएमई साठी 3 लाख कोटी रुपयांच्या सवलतीच्या व्याजदरातल्या पतहमीमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
आवश्यक वस्तू कायद्यातल्या बदलामुळे, शेतकऱ्यांना त्यांचा कृषिमाल त्यांना वाटेल त्याला विकण्याची मुभा, कृषी पायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक,कृषी आणि उद्योग एकत्र आणण्यासाठी चालना यामुळे कृषी क्षेत्र खऱ्याअर्थाने शेतकरी स्नेही झाले आहे.
कोळसा, खाण, संरक्षण, हवाई आणि अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांमुळे सरकारचा सुधारणांकडे असलेला कल स्पष्ट होत आहे. आरबीआयने याआधी जाहीर केलेल्या रोकड सुलभता उपायांबरोबरच 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजमुळे भारताच्या कोविड नंतरच्या विकासाला आकार प्राप्त होत आहे.
प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत गरिबांसाठी याआधी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले. सुमारे 39 कोटी लाभार्थींना 35,000 कोटी रुपयांचे सहाय्य मिळाले. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले अशा 8 कोटी शेतकऱ्यांचा समवेश आहे त्याच बरोबर 20 कोटी जन धन खातेधारक महिलांच्या खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता जमा झाला त्यांचाही यात समवेश आहे
एनएफ एसएअंतर्गत पीएम गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत 80 कोटी गरिबांना प्रती व्यक्ती 5 किलो धान्य आणि प्रती कुटुंब 1 किलो डाळ देण्यात येत आहे. हे धान्य थेट लाभार्थीपर्यंत पोहोचत आहे.
राज्यांच्या कर्ज काढण्याच्या मर्यादेत सकल राज्य उत्पादनाच्या 3 टक्के वरून 5 टक्क्यां पर्यंत करण्यात आलेली वाढ हे सर्वात महत्वाचे पाऊल आहे. यामुळे राज्यांना अतिरिक्त 4 लाख कोटी रुपये निधी सुनिश्चित होणार आहेत.