डॉ. धवन कामकाज सुधारा; हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : सध्या फलटण शहरात व तालुक्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या मध्ये आरोग्य यंत्रणेबाबत बऱ्याच तक्रारी सध्या येत आहेत. तरी फलटणच्या आरोग्य विभागाच्या व उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत कोणीही समाधानी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “डॉ. धवन उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही” असे खडे बोल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन यांना सुनावले. 

फलटण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये कोरोना आढावा बैठक आयोजित केलेली होती. या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झालेले होते. यावेळी फलटणचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. व्यंकट धवन, डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. विक्रांत पोटे, डॉ. शितल सोनवलकर तसेच फलटण तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स उपस्थित होते. 

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, फलटण येथील उप जिल्हा रुग्णालय येथे घेण्यात येणाऱ्या कोरोनाच्या चाचण्या सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घेण्यात यावेत. उप जिल्हा रुग्णालयाने तयार केलेले २५ बेडचे हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करून त्यामधील ६ बेडला  आय. सी. यू. सुविधा उपलब्ध  करून देण्यात यावी व सोमवारपर्यंत ते हॉस्पिटल कार्यान्वित करावे. तसेच दुर्दैवाने एखादा कोरोना बाधित असलेला रुग्ण दगावला गेल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषदेच्या माध्यमातून त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात यावेत. 

फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्टची सुविधा करण्यात यावी व तेथे पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना तेथेच सर्व उपचार देण्यात यावेत. फलटणच्या ग्रामीण भागात जे कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत त्यांना आशा सेविकांमार्फत रोजच्या रोज फॉलोअप घेण्यात यावेत. कोरोना बाधित रुग्णांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होणार नाही याची आवश्यक ती काळजी प्रशाशनने घ्यावी. फलटण नगरपालिकेच्या दवाखान्यात व ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या डॉक्टरांची व औषधांचा पुरवठा आगामी काही दिवसांत केला जाईल, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

फलटण शहरातील व ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी पुढे येऊन कार्य करावे व प्रशाशनाने पुढे येऊन खाजगी डॉक्टरांना पूर्णतः सहकार्य करावे. असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

या वेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी फलटण तालुक्यात चार हजार कोरोना बाधित रुग्ण होतील या दृष्टिकोनातून प्रशाशनाचे नियोजन सुरु आहे. आगामी काळात कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याबाबत प्रशाशन कटिबद्ध राहील याची ग्वाही या वेळी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!