फलटण बसस्थानकाचा ढिसाळ कारभार सुधारा : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 14 जुलै 2023 | फलटण | फलटण शहरासह तालुक्यातील विविध नागरिक व पत्रकारांच्या माध्यमातून फलटण बसस्थानकाची सद्य परिस्थिती बाबत माहिती मिळाली आहे. संपूर्ण ढिसाळ असलेला फलटण आगाराचा कारभार सुधारा अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जा; असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

फलटण बसस्थानकास अचानक भेट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, पत्रकार व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण आगराच्या बाबत वारंवार तक्रारी ह्या लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे आलेल्या आहेत. तालुक्यातील नागरिकांना वारंवार होणारे त्रास हे आता ह्या पुढे सहन केले जाणार नाहीत. प्रवाशांच्या हितासाठी म्हणून फलटण आगाराने काम केले पाहिजे. फक्त फायद्याच्या रूटवर गाडी न चालवता ज्या ठिकाणी वास्तविक गरज आहे; त्या ठिकाणी सुद्धा गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पूर्वी जशी फलटण आगाराची व्यवस्था होती; त्याचप्रमाणे आता सुद्धा व्यवस्था पूर्ववत करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पूर्वी फलटण आगराच्याबाबत एवढ्या अडीअडचणी बाबत एवढ्या तक्रारी प्राप्त होत नव्हत्या त्या मुळे कोरोनाच्या आधीचा परिस्थितीचा आढावा घेवून त्या प्रमाणे कामकाज करावे; असे आवाहन खासदार रणजितसिंह यांनी यावेळी केले.

यावेळी आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांनी फलटण आगारचा सद्य परिस्थिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यासोबतच फलटण आगरामध्ये कमी पडत असलेल्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करावेत; असेही जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!