स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार, मोदी सरकार देशात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स उभारण्यासाठी जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याची योजना आखत आहे. यासाठी १.६८ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज देण्याची याेजना आखली जात आहे.
ब्लूमबर्गनुसार, ऑटोमाेबाइल, सौर पॅनल निर्माते आणि ग्राहकोपयोगी इस्पातची उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना सरकार हे पॅकेज देऊ शकते. तसेच वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया यंत्रे व विशेष फार्मा उत्पादने निर्मात्यांचाही समावेशाचा विचार सुरू आहे.
हा प्रोत्साहन कार्यक्रम भारताच्या धोरण नियोजन संस्थेकडून राबवला जात आहे. याच संस्थेने वर्षाच्या सुरुवातीस चीनच्या बाहेर आपले कारखाने उभारण्याचा विचार करत असलेल्या कंपन्यांना आकर्षित केले होते. यात सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्स, फॉक्सकॉन आदींचा समावेश आहे.