दैनिक स्थैर्य । दि.१६ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । ‘लोकशाही समजून घेताना’ हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयार केलेले पुस्तक नव्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्तावेज असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे काढले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक भेट दिले, त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी संपादित केलेल्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी लिहिलेल्या लोकशाही व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ३३ लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
पुस्तकामध्ये भारतीय निवडणूक यंत्रणा आणि लोकशाहीचे स्वरूप; विविध व्यवस्था आणि लोकशाही; विविध समाजघटक आणि लोकशाही; माध्यमे, तंत्रज्ञान, कला आणि लोकशाही; तसेच, लोकशाही – मुक्तचिंतन या मुख्य विषयांवरील लेखांचा समावेश करण्यात आला आहे.