स्थैर्य, सातारा, दि.०८: कोरोनामुळे बिकट परिस्थितीचा विचार करून जिल्हा बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी पर्यटन कर्जदार सभासदांना 4 टक्के व्याज परतावा, स्थलांतरीत मजूरांना जीवनावश्यक किट, मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
कोरोनामुळे सध्या सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत कृषी पर्यटनास चालना देण्याच्या दष्टीने कृषी पर्यटन कर्जदार सभासदांना 4 टक्के व्याज परताव्यासाठी 28 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तसेच जिल्ह्यातील स्थलांतरीत मजूर व दारिद्र रेषेखालील घटकांना लॉकडाऊनच्या कालावधीत उदर निर्वाहासाठी 1 कोटी खर्च करून जीवनावश्यक वस्तुंचे कीट वितरण केले आहे. जिल्हा बँकेच्या मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संचालक मंडळ सदस्यांचा एक दिवसाचा सभा भत्ता आणि बँक कर्मचार्यांचा एक दिसाच्या पगाराच्या रकमेचे 16 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ऑक्सिजन बेडस् आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता कमी आहे. याकरिता बँक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कोवीड केअर सेंटरला बँक खर्चातून 3 कोटीचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
बँक ग्राहकांना कोरोना काळात घरपोहोच बँकिंग सुविधा, डिजिटल बँकिंग मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, युपिआय, रुपे कार्डद्वारे एटीएम व्यवहार, ई-कॉमर्स व्यवहार, पॉज मशीनवरील व्यवहार, मायक्रो एटीएमद्वारे व्यवसाय प्रतिनिधीमार्फत घरपोहोच बँकिंग आणि एनी ब्रँच बँकिंगद्वारे जिल्ह्यातील ग्राहकाला बँकेच्या 320 पैकी कोणत्याही शाखेतून बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी आ. शिवेंद्रराजे यांनी दिली.