UGCचा महत्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी आणणार नवं पोर्टल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । नवी दिल्ली । विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आता ‘ई-समाधान’ नावाच्या केंद्रीकृत पोर्टलद्वारे विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांच्या सर्व तक्रारी सोडवणार आहे. पुढील आठवड्यात हे पोर्टल कार्यान्वित होईल, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

“संस्थात्मक घटकांच्या तक्रारींचं निराकरण करणं ही आयोगाची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. त्या दिशेनं एक पाऊल म्हणून, यूजीसीने ई-समाधान-ऑनलाइन तक्रार नोंदणी आणि देखरेख प्रणाली आणली आहे. हे व्यासपीठ उच्च शिक्षण संस्थांमधील अनुचित प्रकारांना आळा घालणे, तक्रारींचं निवारण करण्यासाठी वापरलं जाणार आहे. कमिशनने अँटी-रॅगिंग हेल्पलाइन वगळता विद्यमान पोर्टल आणि हेल्पलाइन विलीन केले आहेत आणि नवीन पोर्टल विकसित केलं आहे,” असं अधिकृत निवेदन युजीसीनं दिलं आहे.

आता एक खिडकी योजना असणार

यूजीसीच्या या ई-समाधान पोर्टलवर तक्रारी नोंदवण्यासाठी एक खिडकी प्रणाली असेल जी माऊसच्या एका क्लिकवर सर्व वेळ उपलब्ध असेल. तसेच 1800-111-656 हा मोफत टोल क्रमांक देखील UGC वेबसाइटवर चोवीस तास सात दिवस कोणत्याही समस्येवर तक्रारी नोंदवण्यासाठी उपलब्ध असेल. तक्रार नोंदवण्यासाठी युजर्सला मेल आयडीच्या मदतीनं किंवा टोल-फ्री नंबरवर कॉल करून एक सोपी प्रक्रिया फॉलो करून तक्रार नोंदवता येणार आहे. यानंतर तक्रार नोंदवली जाऊन एक डॉकेट नंबर दिला जाईल जो संबंधित ब्युरो प्रमुखाच्या खात्यांमध्ये आपोआप प्रतिबिंबित होईल. संबंधित ब्युरो निश्चित वेळेत समस्यांचे निराकरण करेल,” असं त्यात म्हटलं आहे.

तक्रारींचा दररोज घेणार आढावा

दरम्यान, प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित ब्युरोहेड दररोज तक्रारींचा आढावा घेतील तर सचिव किंवा अध्यक्ष ते दर आठवड्याला पाहतील. विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मद्वारे विविध तक्रारी दाखल करू शकतात. योग्य दस्तऐवज आणि डॉकेट क्रमांकांमुळे तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. तक्रारींना प्रतिसाद न देणाऱ्या संस्थांची ओळख पटवून त्यावर कठोर पावलं उचलण्यास मदत होईल, अशी माहिती,” UGC च्या अधिकाऱ्यानी दिली.

युजीसीअंतर्गत ३.८५ कोटी विद्यार्थ्यांचा समावेश

यापूर्वी यूजीसीने विविध यंत्रणा उपलब्ध करून दिल्या होत्या. पण एकल-खिडकी प्रणालीच्या अनुपलब्धतेमुळे, विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक तक्रारी नोंदवत होते. त्यामुळे निवारण यंत्रणा संथगतीनं काम करत असल्यानं संबंधितांची चिंता वाढली होती. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये 1,043 विद्यापीठे, 42,343 महाविद्यालये, 3.85 कोटी विद्यार्थी आणि 15.03 लाख शिक्षकांचा समावेश होतो.


Back to top button
Don`t copy text!