सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता ‘ही’ जबाबदारी सोपवली महाविद्यालयांकडे


दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२३ । पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षासाेबतच आता व्दितीय वर्षाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याची जबाबदारीही महाविद्यालयाकडे दिली जाणार आहे. यासाेबतच तृतीय वर्षाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी तालुकास्तरावर केंद्र स्थापन करण्यात येईल. परिसरातील महाविद्यालयांचे प्राध्यापक या केंद्रात येऊन उत्तरपत्रिका तपासणी करतील. विद्यापीठात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देवीदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. संदीप पालवे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांची बैठक पार पडली. यावेळी प्राध्यापक संघटनेचे प्रतिनिधी डाॅ. के. एल. गिरमकर, प्रा. व्ही. एम. शिंदे आणि प्राचार्य संघटनेचे प्रा. डाॅ. संजय खरात आणि प्रा. डाॅ. सुधाकर जाधवर उपस्थित हाेते. सर्वांसाेबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयांना सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून १ ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे.

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची अंमलबजावणी ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विस्कळीत झालेल्या शैक्षणिक आणि परीक्षेच्या वेळापत्रकाची घडी घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, दि. १३ मेपर्यंत काॅलेज सुरू राहणार असून, त्यानंतर १४ मे ते २० जून या कालावधीत काॅलेजला उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. मात्र, या सुटीच्या काळातही परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!