दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । मराठीचा मुद्दा घेऊन राजकारणात जम बसवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाकडून राज ठाकरे यांचे सुपूत्र असलेल्या अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेने रविवारी पत्रक काढून याबाबतची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली होती. राज ठाकरे यांनी सक्षमपणे या संघटनेचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळे राज ठाकरे ह अल्पावधीत लोकप्रिय झाले होते. आता त्यांचे पूत्र अमित ठाकरे यांनाही हीच किमया साधता येणार का, हे पाहावे लागेल.
गेल्या काही काळापासून अमित ठाकरे हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी नाशिकचा दौराही केला होता. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची धुराही अमित ठाकरे यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अमित ठाकरे अलीकडे मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पक्षाच्या अनेक शाखांमध्ये जाऊन त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. अमित ठाकरे यांच्याभोवती असलेल्या वलयामुळे ते सातत्याने चर्चेचा विषयही असतात. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रुपाने अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा कशाप्रकारे सांभाळतात, हे पाहावे लागेल.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले होते. हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.