स्थैर्य, सातारा, दि.२१: श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा १ हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’ ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रामनामाचे महत्व यांविषयी जाणून घेणार आहोत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्येही रामनवमी कशी साजरी करू शकतो हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. रामनवमीला श्रीरामाची उपासना आणि नामजप करून रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !
१. तिथी : रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात.
२. इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.
३. श्रीरामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व : देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. रामनवमी या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.
४. श्रीराम जय राम जय जय राम – श्रीरामाच्या नामजपाचा अर्थ : ‘रामसे बडा रामका नाम‘, असे म्हटलेलेच आहे. ‘रामाचे एक नाम विष्णुसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे’, अशी रामनामाची महती साक्षात् शिवाने गायिली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ‘श्रीराम‘ हे श्रीरामाचे आवाहन आहे. ‘जय राम’ हे स्तुतीवाचक आहे, तर ‘जय जय राम’ हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे.
५. रामनवमीच्या दिवशी पूजाविधी करण्याची पद्धत : प्रभु श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी १२ वाजता साजरा करतात. रामजन्मोत्सव साजरा करतांना प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. श्रीरामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार घालावा. दुपारी १२ वाजता शंखनाद करून ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय !’ असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा पाळणा लावावा. त्यानंतर आरती करावी. नैवेद्याला सुंठवडा (सुंठेचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवावा. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.
६. कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्ये अशी रामनवमी साजरी करा !
अनेक भाविक रामनवमीला रामजन्माच्या वेळी श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. यंदा अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी असल्याने धार्मिक स्थळे बंद आहेत. असे निर्बंध असलेल्या ठिकाणी मंदिरांमध्ये जाता येणे शक्य नाही. त्यामुळे रामनवमीनिमित्त घरीच श्रीरामाची भावपूर्ण आराधना करावी.
१. नामजप ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. घरातील सदस्य घरीच नामजप, तसेच रामरक्षापठण करू शकतात.
२. काही ठिकाणी घरी रामजन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा असते. अशा वेळी माध्यान्हकाळी रामाची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. पूजेसाठी रामाची मूर्ती किंवा प्रतिमा (चित्र) उपलब्ध नसेल, तर रामाचे मुखपृष्ठावर चित्र असलेला एखादा ग्रंथ किंवा नामपट्टी पूजेत ठेवू शकतो. तेही शक्य नसेल, तर पाटावर रांगोळीने ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नाममंत्र लिहून त्याची पूजा करावी. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, असा अध्यात्मातील सिद्धांत आहे. त्यानुसार श्रीरामाच्या मूर्तीमध्ये जे तत्त्व असते, तेच शब्दामध्ये म्हणजे श्रीरामाच्या नामजपामध्येही असते.
३. पूजेसाठी आवश्यक साहित्य मिळण्यास अडचण असेल, तर उपलब्ध पूजासाहित्यामध्ये श्रीरामाची भावपूर्ण पूजा करून रामजन्म करावा. जे पूजासाहित्य उपलब्ध नसेल, त्याऐवजी अक्षता समर्पित कराव्यात. सुंठवड्याचा नैवेद्य दाखवणे शक्य नसेल, तर अन्य गोडपदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. अपुर्या वैद्यकीय सुविधांमुळे या त्रासामध्ये अधिकच भर पडते. एकंदरित सर्वांचेच जीवन ‘रामभरोसे’ असल्यासारखे आहे. ‘रामभरोसे’ ही भावना अनेक जण उद्विग्नेतून व्यक्त करत असले, तरी खर्या अर्थाने भगवंतच भक्ताला तारून नेत असल्याने आता तरी देवाच्या ठिकाणी श्रद्धा दृढ करून आपला संपूर्ण भार श्रीरामाच्या चरणी वाहूया आणि श्रीरामनवमीच्या निमित्ताने झोकून देऊन साधना करण्याचा निश्चय करूया.
७. रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !
रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. तसेच आपणही धर्माचरणी अन् ईश्वराचे भक्त बनलो, तर पूर्वीसारखेच रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र) आताही अवतरेल !
नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम ! प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापण्याचा निर्धार करूया.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्रीराम’