दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । फलटण । शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर व मुधोजी महाविद्यालय वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना 2022-23 अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे जावली, तालुका फलटण या ठिकाणी दिनांक 22 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले आहे. या शिबीराच्या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रा. मदन पाडवी यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो. प्रा. रमेश गवळी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल व राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. शिबीराचे उदघाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी आयुष्यात नवीन शिकण्यासाठी शिबिराचे महत्त्व व राष्ट्रीय सेवा योजनेच्या चिन्हांमधील लाल व निळ्या रंगाचे महत्त्व सांगितले.
फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित मुधोजी महाविद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “युवकांचा ध्यास : ग्राम- शहर ग्रामीण विकास” या घोषवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे जावली येथे दि. 22 जानेवारी 2023 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते शिबीराचे उदघाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुधोजी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी युवकांच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्रामविकास झाला पाहिजे तसेच या शिबिराचा उद्देश फक्त श्रमदान नसून विद्यार्थ्यांबरोबर गावकऱ्यांचेही प्रबोधन झाले पाहिजे व स्वच्छतेचा संदेश सर्वांच्या मनामध्ये रुजला पाहिजे आणि प्रत्येक गावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी गावागावात प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पत्रकार राजकुमार गोफणे , मुधोजी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक, वरिष्ठ विभागाची उपप्राचार्य प्रा. डॉ. दीक्षित सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिरासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे गव्हर्निंग कौन्सिल चे सभासद सदस्य , फ.ए. सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे यांनी शुभेच्छा देऊन ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला जावली गावच्या सरपंच सौ. ज्ञानेश्वरी मकर, उपसरपंच श्री. बाळू ठोंबरे तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, एन.एस.एस समिती सदस्य, मुधोजी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका वृंद पत्रकार बंधू व रा. से. यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. नीलम देशमुख यांनी मानले.