स्थैर्य, सातारा, दि. १२: साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित लेखातून अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्येही अक्षय तृतीया कशी साजरी करू शकतो हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत.
१. महत्त्व
अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः
तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न
अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
‘साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे – अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.
अवतार होणे – अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.
धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे – या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख- समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.
२. अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत : ‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.
३. कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्ये आपत्काळात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे कराल ?
यंदा अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घरी राहूनच धर्माचरण करण्याला प्राधान्य द्यावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पुढील कृती करता येतील.
१. पवित्र स्नान : आपण घरातच गंगेचे स्मरण करून स्नान केल्यास गंगास्नानाचा आपल्याला लाभ होईल. यासाठी पुढील श्लोक म्हणून स्नान करावे.
गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु ||
२. सत्पात्रे दान : सध्या विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत. तरी अध्यात्मप्रसार करणारे संत अथवा अशा संस्थांना आपण ऑनलाइन अर्पण करू शकतो. घरूनच अर्पण दिले जाऊ शकते.
३. उदकुंभाचे दान : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदकुंभ (उदककुंभदान) दान करावे, असे शास्त्र आहे. या दिवशी हे दान करण्यासाठी बाहेर जाणे शक्य न झाल्यास अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचा संकल्प करावा आणि शासकीय नियमांनुसार जेव्हा बाहेर जाणे शक्य असेल, तेव्हाच दान करावे.
४. पितृतर्पण : पितरांना प्रार्थना करून घरूनच पितृतर्पण करता येईल.
५. कुलाचारानुसार अक्षय्य तृतियेला करण्यात येणाऱ्या धार्मिक कृती : वरील कृतींव्यतिरिक्त कुलाचारानुसार अक्षय्य तृतीयेला आपण अन्य काही धार्मिक कृती करत असाल, तर त्या सध्याच्या शासकीय नियमांत बसणाऱ्या आहेत ना, हे पहावे.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’