‘मिशन वात्सल्य’ मिशन मोडवर राबवा – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ हे मिशन आम्ही हाती घेतले आहे.‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात मिशन मोडवर राबविण्याचे  निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले.

मिशन वात्सल्यबाबत आढावा बैठक महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या आढावा बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे,  एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल, सर्व विभागीय महसूल आयुक्त उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या वात्सल्य समितीमार्फत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणामध्ये शासकीय योजनांची माहिती घेणारा नमुना विकसित करून सर्व तालुक्यातील विधवा महिलांचे सर्वेक्षण करून घ्यावे. या महिलांच्या कुटुंबांना भेटी दिल्याशिवाय त्यांचे प्रश्न समजणार नाहीत. यासाठी प्रत्येक तालुक्यातील वात्सल्य समितीच्या सदस्यांनी त्या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गट करून घरोघरी भेटी द्याव्या. त्यातून त्यांचे प्रश्न समजू शकतील .याबाबत सर्व जिल्ह्यांनी नियोजन करायला हवे.

मिशन वात्सल्यबाबत विभागीय स्तरावर महिन्यातून एकदा, जिल्हास्तरावर महिन्यातून दोनदा व तालुकास्तरावर आठवड्यातून एक बैठक घेण्यात यावी. या सर्व बैठकीचा आढावा आयुक्त महिला व बालविकास यांना पाठवावा. या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीने समन्वयाने काम करावे. प्रत्येक जिल्ह्यांनी मिशन वात्सल्य च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांची महिती पुस्तिका तयार करावी व ती महिलापर्यंत पोहचवावी. विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आपण सर्वजण मिळून पूर्ण करू, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!