दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता कोविड लसीकरण कवचकुंडल मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा. ही मोहिम 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित यंत्रणांनी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन मोहिम यशस्वी राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोविड लसीकरण कवचकुंडल मोहिम राबविण्याबाबत जिल्हा सुकाणु समितीची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व्ही.सी.द्वारे उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता लसीकरण मोहिम गतीने राबवा, यासाठी गावनिहाय यादी तयार करावी. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग घ्यावा. या मोहिमेत नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही लसीकरण केंद्रावर आल्यानंतर लसीकरण करावे. तसेच या मोहिमेसंदर्भात तालुका टास्कफोर्सची तात्काळ बैठक घ्या. प्रत्येक विभाग निहाय जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या समन्वयातून पार पाडा. तसेच लसीकरण कवचकुंडल मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.