वित्तीय क्षेत्रावर सुपर ॲप्सचा होणारा परिणाम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । मुंबई । भारतातील अनेक ग्राहक जेव्हा वेगवेगळ्या उपलब्ध किंवा संभाव्य सुपर-अॅप्सचा वापर करतात तेव्हा अशा सुपर अॅप्सकडून किती विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जाऊ शकतात याबद्दलची कल्पनाही त्यांना नसते. विविध सेवांचा एक अत्युत्तम संच म्हणून काम करणाऱ्या अॅप्सची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, आपण एखाद्या फूड डिलिव्हरी अॅपवरून आपले क्रेडिट कार्ड चालवू शकतो आणि एखाद्या सोयीच्या डिजिटल पेमेंट अॅपवरून विमानाची तिकिटेही बुक करू शकतो. सध्या वापरले जाणारे आणि लोकप्रिय असलेली अशी अनेक अॅप्स हळूहळू सुपर-अॅप्समध्ये रूपांतरित झाली आहेत.

या सुपर-अॅप्सना मिळणारा लोकांचा प्रतिसाद हा सर्वसाधारणपणे सकारात्मक आहे, परिणामी येत्या पाच वर्षांमध्ये त्यांचा सीएजीआर २४% च्या आसपास असेल, असा अंदाज आहे. या दशकाच्या अखेरीस या संपूर्ण उद्योगक्षेत्राचे आकारमान ८०० बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असे भाकितही केले जात आहे. या अॅप्लिकेशन्सनी वित्तीय सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये आणलेल्या नव्या प्रवाहामुळे हे क्षेत्र ही अभूतपूर्व वाढ साध्य करणार आहे.

सुपर अॅप्सच्या उदयाबरोबरच आर्थिक परिदृश्यामध्येही लक्षणीय घडामोडी घडताना दिसतील असा अंदाज एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी यांनी व्यक्त केला.

बँकिंग क्षेत्रावर होणारा परिणाम: सुपर-अॅप्सच्या काही लक्षणीय फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे वित्तीय मंचांतर्गत विविध वित्तीय आणि बँकिंग सेवांचे एकत्रिकरण करून ग्राहकांना एक अखंड अनुभव देण्याची त्यांची क्षमता. बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने याचा अर्थ असा होतो की, अनेक यूजर्स बँकिंग अॅप्सना बगल देऊन या एकात्मिक सुपर-अॅप्सचा अधिक वापर करतील.

उदाहरणार्थ, एका अग्रगण्य फूड डिलिव्हरी कंपनीचे एडिशन कार्ड (एका प्रसिद्ध व्यावसायिक बँकेच्या सहयोगाने काढलेले) यूजर्सना पारंपरिक बँकिंगच्या माध्यमांना वळसा घालून जाण्याची मुभा देते आणि सुपर-अॅपच्या माध्यमातून सर्व बँकिंग व्यवहार चालवते/सांभाळते. यात भर म्हणजे डिजिटल वॉलेट्सची सोय असलेल्या सुपर-अॅप्समुळे यूजर्सना व्यवहारांच्या जगात वावरणे सोपे जाते आणि त्यांना रोख रक्कम किंवा क्रेडिट कार्डसवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते.

वित्तीय सेवांवरील प्रभाव: एकात्मिक सेवांचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम ब्रोकरेज, गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रालाही जाणवणार आहे. सुपर अॅप्सच्या माध्यमातून यूजर्सना आपली पत आणि आपल्या निव्वळ मालमत्तेचे मूल्यमापन करता येते. इतकेच नव्हे, तर सुपर-अॅप्समुळे चालू गुंतवणूकीमध्ये हरक्षणी कोणकोणते चढउतार होत आहेत यावर देखरेख ठेवण्याची संधीही मिळते. यूजर्सना एक वॉचलिस्टही बनवता येते, जिथे त्यांना बाजारातील चढउतारांचे विश्लेषणही करता येते.

उदाहरणार्थ, भारतातील एक सुपर-अॅप यूजर्सना म्युच्युअल फंड्स आणि इक्विटीजमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते, त्यांचा यूएस मार्केट्सशी संपर्क साधून देते, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शिफारशी देते व अशा इतर अनेक सुविधा पुरविते. या नव्या सुविधांमुळे गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापनाची प्रक्रिया कधी नव्हे इतकी चांगली बनली आहे.

विमा क्षेत्रावरील परिणाम: कागदपत्रे भरण्याचे किचकट काम आणि विमा उतरविण्याची प्रदीर्घ प्रक्रिया या पूर्वीपासूनच विमा क्षेत्राशी संबंधित सर्वात लक्षणीय समस्या राहिल्या आहेत. डिजिटल पेमेंट अॅपमध्ये जीवनविमा आणि सर्वसाधारण विमा यांचे एकत्रिकरण केले गेल्याने विमा उतरविण्याची एकूण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि श्रम खूपच कमी झाले आहेत. याचा अधिक संख्येने लोक विम्याच्या संरक्षणाखाली येणार आहे. उदाहरणार्थ, सध्या सुमारे भारतातील ४१% घरांमध्ये किमान एका व्यक्तीचा आरोग्य विमा उतरविलेला असतो. भारतीय लोकसंख्येच्या आकारमानाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. सुपर-अॅप्सच्या उदयामुळे ही परिस्थिती बऱ्यापैकी बदलू शकेल.

सारांश: सुपर अॅप्स ही अनेक प्रकारची उत्पादने आणि सेवा पुरविणारे एकच पोर्टल म्हणून काम करतात. भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत चीन आणि यूएसमध्ये अधिक प्रगत, एकात्मिक आणि सर्वदूर सेवा पुरविणारे सुपर अॅप्स आहेत. याबाबतीत भारतीय बाजारपेठ अजूनही विकसित होत आहे. असे असले तरीही अशा अनेक अॅप्लिकेशन्सनी कार्यान्वयनाच्या आणि विविध प्रकारच्या सेवा एकत्र आणण्याच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरीचे संकेत दिले आहेत. हळूहळू या अॅप्सचा वापर करण्याचे प्रमाण वाढेल आणि तेव्हा वित्तीय व्यवहारांचे क्षेत्र अधिक समावेशक बनेल, अशी अपेक्षा आहे. तेव्हा अधिक नवनवी उत्पादने आणि सेवा दुर्गम भागांतही सहज आणि वेगाने पोहोचू शकतील.


Back to top button
Don`t copy text!