लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचा महाराष्ट्रावर प्रभाव – राज्यशास्त्रज्ञ डॉ अशोक चौसाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २८: आशियाई देशातील लोकांचे जनजागरण, भारतीय धर्मनिपरपेक्ष राष्ट्रवादाची मांडणी आणि देशात लोकशाही स्थापन होण्यासाठी मांडलेले विचार हे लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचे महत्त्वाचे पैलु असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जाणवतो, असे मत विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना लोकमान्य टिळक यांचा वारसा या विषयावर डॉ. चौसाळकर बोलत होते.

आधुनिक भारताच्या इतिहासात 1880 ते 1920 या कालावधीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्रिटीश सत्ताधाऱ्यांविरुध्द उभे राहण्यासाठी त्यांनी भारतीय जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. दैनिक केसरीच्या शिरोभागी लिहिलेल्या श्लोकातून टिळकांनी ब्रिटीश सत्तेचा मदांध सत्ताधारी असा उल्लेख करून मोठे आवाहन दिले होते व आयुष्यभर त्यांनी ब्रिटीश साम्राज्यवादाविरूध्द लढा दिला. या संपूर्ण कालावधीत लो.टिळकांनी दिलेला वैचारिक वारसा हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. चौसाळकर म्हणाले.

ब्रिटीशांच्या दडपशाहीमुळे भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेली भीती नष्ट करून त्यांच्यामध्ये वीर वृत्तीचे पोषण करण्याचे कार्य टिळकांनी केले. टिळकांनी मराठी भाषेत लिखाण केले त्यासाठी वर्तमानपत्र काढले. लोकांमध्ये जावून कार्य केले. लोकचळवळ उभारल्या. राजकीय कारणासाठी तुरुंगवास भोगणारे लो. टिळक हे पहिले भारतीय राजकीय पुढारी होत. कोल्हापूर प्रकरणात लो. टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना 101 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. 1897 ते 1899 या काळात त्यांना राजद्रोहासाठी तुरुंगवास भोगावा लागला. 1908 ते 1914 असा दीर्घ काळाचा कारावास त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात भोगावा लागला.

1918 साली पॅरीस येथे भरलेल्या परिषदेत टिळकांनी राष्ट्रीय स्वयं निर्णयाचा प्रस्ताव मांडला होता व अनेक देशांनी याला पाठिंबा दिला. टिळकांनी राष्ट्रवादाची शिकवण दिली. धर्माधिष्टीत राष्ट्रात प्रत्येकास आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे असा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद त्यांनी मांडला. टिळकांनी स्वराज्याची कल्पना मांडताना लोकशाही राज्याची भूमिका मांडली. स्वराज्यात जनतेला स्वत:चे भवितव्य घडविण्याचा अधिकार असावा, लोकांना मनाप्रमाणे सरकार निवडण्याचा अधिकार असावा, स्वराज्याचा कारभार लोककल्याणासाठी व्हावा असे टिळक मानत. गीता रहस्य ग्रंथाच्या माध्यमातून आपले कर्तव्य निस्वार्थपणे करावे व अन्यायाचा निष्काम भावनेने प्रतिकार करावा, असा विचार टिळकांनी मांडला.

स्वराज्यस्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या आधारावर टिळकांनी ब्रिटीश सरकार विरुध्द निडरपणे संघर्ष केला. 1905-06 मध्ये देशात वंगभंगाविरूध्द सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये टिळकांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी होमरूल चळवळ अर्थात स्वराज्य संघाची चळवळ सुरु केली त्यासाठी त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली व  हजारो लोकांना लीगचे सभासद बनवले.

होमरूल लीगचे महत्त्व सांगताना लो. टिळकांनी, ‘स्वराज्य माझा जन्म सिध्द हक्क आहे व तो मी मिळविणारच अशी प्रसिध्द घोषणा केली. हजारो लोक या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत स्त्रिया मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. स्वराज्याचे अधिकार हे जनतेचे जन्मसिध्द अधिकार असून नैसर्गिकरित्या ते प्राप्त झाले आहेत अशी  टिळकांची मांडणी होती.

टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटीक पार्टीची स्थापना करून 1920 मध्ये त्या पार्टीचा जाहीरनामा घोषित केला. यात नवभारताची प्रतिमा अभिव्यक्त झाल्याचे दिसते. लोकमान्य टिळकांनी देशासह महाराष्ट्राला दिलेला हा वैचारिक वारसा जपून महाराष्ट्राला पुढे घेवून जावू या असा विश्वास डॉ.चौसाळकर यांनी यावेळी मांडला.


Back to top button
Don`t copy text!