मेढा, केळघर, महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक तातडीने पूर्ववत करा – आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । महाबळेश्वर या मार्गावरील केळघर येथील स्मशानभूमीजवळील ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद पडली. दरम्यान, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याच मार्गावर नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलावर तातडीने भराव टाकून वाहतूक पूर्ववत सुरु करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यामुळे उद्या सकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मेढा ते महाबळेश्वर या मुख्य मार्गावर केळघर गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ ओढ्यावरील पुलाचा भराव मुसळधार पावसामुळे आणि ओढ्याला पूर आल्याने आज सकाळी वाहून गेला. यामुळे महाबळेश्वर ते मेढा या मार्गावरील वाहतूक बंद पडली आणि सुमारे १२ ते १५ गावांचा संपर्क तुटला. याची माहिती मिळाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुसळधार पाऊस सुरु असतानाही घटनास्थळी धाव घेतली. वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. सध्या सातारा, मेढा ते महाबळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून भराव वाहून गेलेल्या पुलाच्या लगतच नवीन पुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. या नवीन पुलावर खडी टाकून तातडीने भराव तयार करावा आणि या मार्गावरील बंद पडलेली वाहतूक त्वरित पूर्ववत सुरु करावी अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार नवीन पुलावर भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून या मार्गावरील वाहतूक उद्या सकाळपर्यंत पूर्ववत सुरु होईल अशी आशा आहे. पाहणी  करताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या समवेत जावळी पंचायत समितीचे उप सभापती सौरभ शिंदे, ज्ञानदेव रांजणे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!