स्थैर्य, फलटण, दि.३०: साखरवाडी येथे ग्रामपंचायत माध्यमातून १०० बेडचे आणखी एक विलगीकरण कक्ष उभारण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत बाधीत रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तींची तपासणी प्राधान्याने केली पाहिजे त्याचे प्रमाण वाढवा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत आज दिल्या आहेत.
साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह भोसले, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सरपंच रेखाताई जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामदक्षता समिती, पोलीस पाटील सौ. सोनालीताई सचिन पवार, प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोडमिसे, अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना आढावा, तपासणी, लसीकरण, कोरोना केअर सेंटर्सची पाहणी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या, ग्रामस्थांच्या सूचना वगैरे दृष्टीने आज (शनिवार) दिवसभर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या, त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार आणि स्थानिक महसूल मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामदक्षता समिती सदस्य, सरपंच व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.
साखरवाडी येथे हायरिस्क क्षेत्रातील लोकांची तपासणी कमी असल्याने बाधीत असूनही ते उपचारापासून दूर राहिल्याने रुग्ण संख्या वाढत आहे, त्यासाठी हायरिस्क क्षेत्रात तपासणी वाढविणे आवश्यक आहे, तसेच शासन निर्णया नुसार आता गृह विलगीकरण संकल्पना बंद करण्यात आली असल्याने आता सर्वांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल होऊन उपचार घ्यावेत असे आवाहन करतानाच दत्त फौंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेला विलगीकरण कक्ष उत्तम आहे तथापी, रुग्ण संख्या विचारात घेता ग्रामपंचायत माध्यमातून १०० बेड क्षमतेचा आणखी एक विलगीकरण कक्ष तातडीने उभारण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले व विलगीकरण कक्ष उभारण्याची मागणी केली.
साखरवाडी येथे सर्वेक्षण, तपासणी वगैरे कामासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना योग्य माहिती देण्यास कोणीही टाळाटाळ करु नये असे आवाहन करताना या कामात सरपंच, ग्रामदक्षता समिती यांनी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना मदत करावी असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.