दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्वरित दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनी फलटण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन कोरडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध राज्यभर आंदोलन सुरु असून फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना येथील शेतकऱ्यांच्यावतीने वीज पुरवठ्याबाबत यापूर्वी निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे या निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
शेती पंपास दिवसा १० तास योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा व्हावा, शेती पंपाचे वीज बिल मीटर रिडींग प्रमाणे दुरुस्त करुन मिळावे, शेती पंपाच्या वीज जोडणी कोणत्याही कारणासाठी तोडू नयेत, शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेल्या वीज वाहिन्यांसाठी वापरलेले खांबाचे व रोहित्रांचे मासिक भाडे शेतकऱ्यांना वीज अधीनियम २००३ मधील तरतुदीनुसार मिळावे, वीज बिलाची पठाणी पद्धतीने होणारी वसूली थांबवावी, शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणाने वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसान व जनावरे, माणसांच्या मृत्यूची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, फलटण तालुक्याच्या पूर्व भागात विशेषतः गोखळी, गुणवरे, मुंजवडी, बरड या परिसरात शेती पंपांना सलग ८ तासाऐवजी ४ तास वीज पुरवठा होत आहे, वीज बिल वसुलीसाठी संपूर्ण डी. पी. बंद केला जात असल्याने ज्यांची वीज बिलाची थकबाकी नाही त्यांचाही वीज पुरवठा खंडित होत आहे, तसेच ज्यांची थकबाकी आहे त्यांचे पाण्यावाचून पिके जळल्याने नुकसान होत आहे, तरी वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करु नये, वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्ते द्यावेत, नादुरुस्त डी. पी. २४ तासात बदलून द्यावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रविंद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष प्रमोद माने, तालुकाध्यक्ष दादा माने, उपाध्यक्ष शकील सिकंदर मणेर, उपाध्यक्ष निखिल नाळे, शहराध्यक्ष सचिन खानविलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.