पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या डहाणूतील मच्छीमारांची तात्काळ सुटका करा ! – आमदार विनोद निकोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या डहाणूतील मच्छीमारांची तात्काळ सुटका करून परत आणावे म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेता विधानसभा, मत्स्य व्यवसाय मंत्री, बंदरे मंत्री यांना इमेल द्वारे पत्र लिहून जोरदारपणे मागणी केली आहे.

यावेळी आ. निकोले म्हाणाले की, पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने ‘पुस्ती कृपा’ व ‘मत्स्यगंधा 9’ या 2 भारतीय मासेमारी बोटी ताब्यात घेतल्या असून त्यातील 16 मच्छिमारांना त्यांच्या हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. त्यातील 7 जण पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळच्या गावातील आहेत. प्रथमच महाराष्ट्रातील मच्छिमार एवढ्या मोठ्या संख्येने पकडले गेले आहेत; मात्र हे मच्छिमार भारतीय हद्दीत असूनही त्यांना पकडल्याचा दावा गुजरातमधील मांगरोळ येथील बोटमालक मुळजीभाई खोरावा यांनी केला आहे. याबाबत बोटीच्या मालकांपर्यंत ही खबर आली आहे. पकडण्यात आलेल्या 2 बोटींवर अनुक्रमे 9 व 7 मच्छिमार होते. 7 जणांपैकी 6 जण डहाणूजवळच्या अस्वली गावाजवळील आहेत. नवस्या महादा भीमरा, सरित उमरसादा, विजय नगवासी, जयराम ठाकर, उमजी पाडवी, विनोद कोल हे एका गावातील असून कृष्णा रमण भुजाड हे अन्य एका गावचे आहेत. अशी माहिती बोटमालक मुळजीभाई खोरावा यांना मिळाल्याचे कळतंय. नमूद मच्छिमारांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी मच्छिमार कुटुंबीय आणि बोटमालकांसहित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत. दि. 27 सप्टेंबरला पकडलेल्या बोटीतील मच्छिमारांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. एखादा मच्छिमार पकडला गेला की त्याला पाकिस्तानच्या तुरुंगात साधारण दीड ते दोन वर्षे खितपत पडावे लागते, असा साधारण अनुभव आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने या प्रश्नी केंद्र सरकारवर जास्तीतजास्त दबाव आणण्याची गरज आहे. या प्रकाराने, गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील श्रीधर चामरे या मच्छिमाराचा पाकिस्तानी मेरिटाइम एजन्सीने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता, त्याची आठवण ताजी झाली आहे. त्याच्या कुटुंबियांना अद्याप कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळालेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तसेच या विषयावर माकप महासचिव कॉ. सीताराम येचुरी व पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे हे केंद्र सरकार सोबत चर्चा करतील ही माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिली.

यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत घोरखाना, डहाणू शहर सचिव कॉ. धनेश अक्रे, कॉ. राजेश जाधव, कॉ. कमलेश राबड, कॉ. राजेश दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!