
स्थैर्य, फलटण, दि. २३ डिसेंबर : फलटण शहरातील गजबजलेल्या शुक्रवार पेठ आणि मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांची सोय असलेली पोस्ट ऑफिसेस बंद करण्याच्या हालचाली सुरू असतानाच, नवनियुक्त नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “काहीही झाले तरी आपल्या प्रभागातील आणि शहरातील महत्त्वाची पोस्ट ऑफिसेस बंद होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार सिद्धाली शहा यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शुक्रवार पेठ आणि मार्केट यार्ड ही फलटण शहराची व्यापारी आणि निवासी दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. येथील पोस्ट ऑफिस बंद झाल्यास ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होणार आहे, ही बाब लक्षात येताच सिद्धाली शहा यांनी तातडीने पावले उचलली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोस्ट ऑफिस बंद होण्याबाबतची चर्चा सुरू होताच भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धाली शहा यांनी स्थानिक आमदार सचिन पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. आमदार सचिन पाटील यांनीही विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित पुणे रिजनच्या मुख्य पोस्ट प्रबंधकांसाठी (Chief Postmaster General) शिफारस पत्र दिले.
हे पत्र घेऊन नवनियुक्त नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी पुणे रिजनच्या मुख्य पोस्ट प्रबंधक कार्यालयाशी संपर्क साधला आणि आपली मागणी लावून धरली. “ही पोस्ट ऑफिसेस केवळ कार्यालये नसून ती या परिसरातील दैनंदिन व्यवहाराचा कणा आहेत. ती बंद झाल्यास नागरिकांना मुख्य पोस्ट ऑफिसला जाण्यासाठी हेलपाटे मारावे लागतील, जे खपवून घेतले जाणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी सिद्धाली शहा यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. “काहीही झाले तरी आपल्या नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही. प्रशासकीय पातळीवर जो काही पाठपुरावा लागेल तो आपण करू, पण ही सेवा अखंडित राहिली पाहिजे,” अशी ग्वाही आमदार पाटील यांनी सिद्धाली शहा यांना दिली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान मिळवलेल्या सिद्धाली शहा यांनी विजयानंतर शांत न बसता लगेचच कामाचा धडाका लावला आहे. विजयाच्या जल्लोषात न रमता त्यांनी जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या संदर्भात पुणे पोस्ट विभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून, सिद्धाली शहा यांच्या या प्रयत्नांमुळे शुक्रवार पेठ आणि मार्केट यार्डमधील पोस्ट सेवा पूर्ववत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. “आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे लोक आहोत, विकास आणि सोयीसुविधांसाठी मी सदैव कटिबद्ध असेन,” असे प्रतिपादन शेवटी सिद्धाली शहा यांनी केले.

